दक्षिण मुंबईची शान असलेल्या ‘इरॉस’ चित्रपटगृहाची दारं ७ वर्षांनी उघडली

    10-Feb-2024
Total Views |

eros 
 
मुंबई : मुंबईत अनेक चित्रपटगृहे आहेत परंतु दक्षिण मुंबईची शान असलेले ‘इरॉस’ चित्रपटगृह गेला काही काळ बंद असल्यामुळे प्रेक्षकांची गौरसोय नक्कीच होत होती. मात्र, आता पुन्हा एकदा ‘इरॉस’ चित्रपटगृह नव्या रुपाने खुले झाले असून प्रेक्षकांना मनमुरादपणे चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. २०१७ सालापासून ‘इरॉस’ दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले होते. आता ७ वर्षांनी या चित्रपटगृहाला नवी झळाळी मिळाली आहे. दरम्यान, शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्या ‘तेरी बातोमें ऐसा उलझा जिया’ या चित्रपटाच्या शोने या चित्रपटगृहाचे दार पुन्हा उघडले आहे. याशिवाय ‘फायटर’ चित्रपटाचे शो देखील सुरु आहेत.
 
चर्चगेट स्टेशनच्या समोर आपल्या खास स्थापत्य वास्तूशैलीत उभारलेले ९० वर्ष जुने ‘इरॉस’ थिएटर हे इंग्रजांच्या काळातले. या चित्रपटगृहाची खासियत म्हणजे मुंबईतल्या अत्यंत श्रीमंत भागातले हे पहिले आयमॅक्स चित्रपटगृह आहे. आता नव्याने सुरु झालेल्या या चित्रपटगृहात ३०० आसनांची क्षमता असून वैविध्यपूर्ण आधुनिक सोयी सुविधांनी ते सुसज्ज झाले आहे.
 
‘इरॉस’ चित्रपटगृह १९३५ साली पारशी व्यापारी शियावक्स कावसजी कंबाटा यांच्या मालकीच्या जागेवर वास्तुविशारद सोहराबजी भेदवार यांनी १० फेब्रुवारी १९३८ साली उभे केले. या चित्रपटगृहाचे ‘इरॉस’ हे नाव ग्रीक देवतेच्या नावावरुन ठेवण्या आले. ‘इरॉस’ची इमारत कंबाटा कुटुंबाच्या मालकीची होती. त्यानंतर ती मेट्रो रिअॅलिटीला ३० वर्षे भाडे तत्त्वावर देण्यात आली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.