"उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम; उद्धवजी गेट वेल सून"

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा घणाघात

    10-Feb-2024
Total Views |

Uddhav Thackeray


नाशिक :
उद्धव ठाकरेंची भाषा बघून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं वाटतं. त्यामुळे उद्धवजी गेट वेल सून, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला.
 
मुंबईतील दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा याने गोळ्या झाडून हत्या केली. यावरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, "उद्धव ठाकरेंची भाषा आणि शब्द बघून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं माझं ठाम मत झालं आहे. त्यामुळे मी आता एवढंच बोलेन उद्धवजी गेट वेल सून."
 
"ज्या घटना घडलेल्या आहेत त्या व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या आहेत. त्या घटना गंभीरच आहेत. त्यांची गंभीरता मी नाकारत नाही पण, व्यक्तिगत वैमनस्यातून या घटना घडलेल्या असल्यामुळे त्याचा संबंध राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंध जोडणे अयोग्य आहे. प्रत्येक घटनेच्या मागे वैयक्तिक कारणं आणि वैयक्तिक हेवेदावे आहेत. पंरतू, याबाबतीतही आम्ही कडक कारवाई करत आहोत," असेही ते म्हणाले.
 
घोसाळकर प्रकरणामध्ये सत्ताधारी पक्षाच्या महिला किंवा पुरुष प्रवक्त्त्याचा हात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. यावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "विजय वडेट्टीवारांना तसं काही फार माहिती नसतं. ते असं काहीतरी सणसणाटी गोष्टी बोलत असतात. कुठल्याही गोष्टीची चौकशी योग्य प्रकारे होईलच. पण अलिकडच्या काळात जे विनाकारण गोपीचंद जासूस, जग्गा जासूस तयार झाले आहेत त्यांनी जरा विचारपुर्वक बोललं पाहिजे," असेही ते म्हणाले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.