गुरूंना ‘भारतरत्न’ मिळाल्याचा अत्यानंद

    10-Feb-2024
Total Views |
Dr. M. S. Swaminathan

केंद्र शासनाने प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांची ’भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च सन्मानासाठी निवड करून, एका अलौकिक कृषी शास्त्रज्ञ असलेल्या सुपुत्राचा सन्मान केला आहे. त्यामुळे याचा आनंद मला त्यांचा विद्यार्थी म्हणून विशेष आहे. देशातील कृषी क्षेत्र, कृषी तज्ज्ञ आणि शेतकरी यांनी देश उभारणीसाठी गेल्या ५०-६० वर्षांत दिलेल्या योगदानाचाही हा सन्मान आहे, अशा माझ्या भावना आहेत. त्यांचा विद्यार्थी म्हणून मला आणि माझ्यासारख्या अनेकांसाठी हा अभिमानाचा क्षण वाटतो. त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या आठवणींचा पट तरळतो, तेव्हा हा आनंद आणखी हुरूप वाढवितो.

केंद्र सरकारने केलेल्या या यथोचित गौरवामुळे देशाच्या कृषी क्षेत्राचा देखील एका अर्थाने मोठा सन्मान राखल्या गेला, हे मला प्राधान्याने नमूद करावेसे वाटते. देश समृद्ध करण्यात आणि देशाची भूक भागविण्याची क्षमता निर्माण करण्यात शेतकरी देत असलेले योगदान हे त्यांच्याच संशोधनाचे फलित तर आहेच; मात्र त्यातून या क्षेत्राला नवी उभारीही येत असल्याने, ’आनंदोत्सवा’चे वर्णन करण्यास मला शब्ददेखील कमी पडतात, अशी माझी कृतार्थ भावना आहे. आज आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत आणि हरित क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होण्याकडे वेगाने वाटचाल करतो, अशावेळी एक क्रांती घडवून आणलेल्या, स्वामीनाथन यांचा सर्वोच्च सन्मान होणे, हे उचित वाटते. अमृत महोत्सवी वर्षात हा आनंद मिळाला, हे आणखी एक मोठं समाधानदेखील आहे.’भारतीय हरितक्रांतीचे जनक’ अशी डॉ. स्वामीनाथन यांची जगाला ओळख आहे. त्यांनी १९६०-७०च्या दशकात अधिक उत्पादन देणार्‍या मेक्सिकन गव्हाच्या वाणांचे महत्त्व ओळखून त्या वाणांवर देशात सर्वत्र संशोधन घडवून आणले, यात आम्हा विद्यार्थ्यांस त्यांच्या या अनुभवाचा लाभ घेता आला, हे माझे भाग्यच आहे.
 
वाणांपासून अधिक उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करून, शेतकर्‍यांना त्याविषयी त्यांनी अवगत केले, त्यांच्या जाणिवा अधिक समृद्ध व्यापक केल्यात असे मला वाटते. शिवाय राज्यकर्ते, प्रशासक, शास्त्रज्ञ, शेतकरी व प्रसारमाध्यमे यांचा समन्वय घडवून आणून, देशाच्या अन्नधान्य उत्पादन रथाचे त्यांनी सारथ्य केले. या प्रयत्नातूनच केवळ पाच-सहा वर्षांत १९७०च्या दरम्यान देशातील गव्हाचे उत्पादन दुप्पट होऊन, देश अन्नधान्याच्या गरजेबाबत स्वयंपूर्ण झाला. त्या काळात नवी दिल्ली येथे ’भारतीय कृषी संशोधन संस्थे’त डॉ. स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना, ही प्रक्रिया जवळून पाहायाचे भाग्य आम्हा विद्यार्थ्यांना लाभले. गव्हानंतर भात उत्पादनातही क्रांती झाली. देशातील कृषी क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांचाच आत्मविश्वास वाढला. कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याचा दर्जा व विस्तार वाढून जगन्मान्यता मिळावी, अशी आम्हा कृषी विषयात रुची असणार्‍या विद्यार्थ्यांची इच्छा आहे. आमच्या गुरूंच्या प्रयत्नांमुळे आज एक ‘कृषिशक्ती’ म्हणून आपल्या देशाची ओळख निर्माण झाली. ‘कोविड’च्या काळातही जगाने हे अनुभवले आहे.

डॉ. स्वामीनाथन हे भारतीयच नव्हे, तर जागतिक भूकमुक्तीचे अग्रदूत ठरले आहेत. फिलिपाईन्समधील ’आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थे’चे संचालक असताना, जागतिक स्तरावर भात उत्पादन वाढीसाठी बहुमूल्य नेतृत्व करून, त्यांनी आपल्या देशाचा गौरव वाढविला. ते उत्कृष्ट शिक्षक व द्रष्टे शास्त्रज्ञ, कुशल प्रशासक व मुत्सद्दी आणि थोर मानवतावादी व्यक्ती होते, नव्हे तर एक संस्थाच होते.विशेष म्हणजे, अखेरच्या श्वासापर्यंत ते कार्यरत होते. त्यांचे जीवन आणि कार्य सदैव या क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्‍यांसाठी आणि देशातील कुशल शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन करीत राहील, असा मला विश्वास वाटतो.राज्यसभेचे सभासद व देशाच्या शेतकरी आयोगाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी शेतकरी कल्याणासाठी केलेल्या शिफारसींमुळे, ते शेतकर्‍यांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.
 
‘भारतीय कृषी संशोधन संस्थे’चे संचालक व नंतर ‘भारतीय कृषी संशोधन परिषदे’चे महासंचालक, केंद्रीय कृषी सचीव, नियोजन मंडळाचे सदस्य व उपाध्यक्ष, राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष, राज्यसभेचे सदस्य, ’आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थे’चे महासंचालक अशा विविध जबाबदार्‍या डॉ. स्वामीनाथन यांनी समर्थपणे व यशस्वीरित्या पार पाडून, प्रत्येक क्षेत्रास नवी दिशा दिली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी वैश्विक पातळीवर ठसा उमटविला. त्यांना ८० पेक्षा जास्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सुमारे ८५ विद्यापीठांच्या मानद ‘डॉक्टरेट’ पदव्या आणि सुमारे ४० आंतररष्ट्रीय अकॅडेमींची मानद फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. अशा महान विभूतीचा देशाने ’भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव केला, ही खरोखरच सर्व देशवासीयांसाठी आणि माझ्यासारख्या त्यांच्या विद्यार्थ्यासाठी आनंददायक घटना आहे!
 


- योगेंद्र नेरकर
(लेखक हे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत)
(शब्दांकन : अतुल तांदळीकर)


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.