रोहिणी हट्टंग़डी आणि दिलीप प्रभावळकर म्हणतायत 'आता वेळ झाली'

01 Feb 2024 15:47:00

rohini and dilip movie 
 
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध विषयांवर आधारित चित्रपट येत आहेत. यातील अनेक चित्रपट हे प्रदर्शनापुर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवत आहेत. याच यादीतील एका चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर इच्छा मरण या विषयावर भाष्य करणाऱ्या आता वेळ झाली या चित्रपटात एकत्रित दिसणार आहेत.
अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित, लिखित 'आता वेळ झाली' या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले. दरम्यान, या चित्रपटाची कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे.
 
चित्रपटाबद्दल अनंत नारायण महादेवन म्हणतात," जीवनाचा शेवट आनंदी व्हावा, असे वाटणाऱ्या प्रत्येक वयस्काच्या अस्तित्वाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे हृषिकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ची दुसरी बाजू आहे. इच्छामरण हा एक असा विषय आहे, ज्याने या महामारीच्या काळात मला प्रभावित केले. जेव्हा जगाने जीवन आणि मृत्यूकडे एका वेगळ्या नजरेने पाहाण्यास सुरूवात केली. तरुणाईचाही जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला. भौतिकवादी दृष्टीकोनापेक्षा व्यावहारिक दृष्टीकोनाकडे त्यांचा कल वाढला. हा चित्रपट पाहून वृद्धांच्या मनातील घालमेल तरूणाईला नक्कीच कळेल.’’
 
 

rohini and dilip 
 
 
डेल्लास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट अभिनेता), राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) आणि लोकप्रिय जागरण चित्रपट महोत्सव, शारजाह फिल्म प्लॅटफॅार्म इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॅार्ड यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी ‘आता वेल झाली’ची यापूर्वीच निवड झाली आहे. दरम्यान, इमेजीन एंटरटेन्मेंट अँड मीडिया,अनंत नारायण महादेवन फिल्म्स यांच्या सहयोगाने 'आता वेळ झाली' या चित्रपटाचे दिनेश बंसल , जी. के. अग्रवाल आणि अनंत महादेवन निर्माते आहेत.  'आता वेळ झाली' या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह या चित्रपटात भरत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्याही प्रमुख भूमिका असून २३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.
Powered By Sangraha 9.0