९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साने गुरुजी साहित्य नगरी सज्ज!

01 Feb 2024 16:48:24

Marathi Sahitya Sammelan


जळगाव :
अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साने गुरूजी साहित्य नगरी सज्ज झाली आहे. साहित्यिक रविंद्र शोभणे अध्यक्ष आणि ना. गिरीश महाजन स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत सुमित्राताई महाजन यांनी अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषाताई तांबे यांना आपली स्विकृती कळवली असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक व म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली.
 
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. गुरुवार १ फेब्रुवारी रोजी संमेलनपूर्व कार्यक्रम होणार आहेत. सकाळ पासुनच बालसाहित्य संमेलन, कथाकथन सत्र, काव्यवाचन, बालनाटय व नाट्यछटा सत्र होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी ०२ फेब्रु. रोजी सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार असुन यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार तर शिक्षणमंत्री दिपक केसरकर विशेष अतिथी आहेत.
 
शनिवार ०३ फेब्रु.रोजी सकाळी ९:३० वा. पद्मश्री गिरिश प्रभुणे यांची मुलाखत रविंद्र गोळे आणि सारंग दर्शने घेतील. रविवार ०४ फेब्रु.रोजी सकाळी ९ वा. प्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांची प्रकट मुलाखत दीपाली केळकर घेतील. संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच संमेलानाच्या समारोपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष अतिथी आणि शिक्षणमंत्री दिपक केसरकर हे देखील उपस्थित राहणार आहेत.
 
अंमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या साने गुरुजी साहित्य नगरीत संमेलनाची जय्यत तयारी झाली असून संमेलनाचा उत्साह संपूर्ण खान्देशात दिसून येत आहे. संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, प्रमुख संरक्षक व सल्लागार तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, संरक्षक व सल्लागार तथा जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन आदी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.




Powered By Sangraha 9.0