दि. २१ डिसेंबर ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून जाहीर

09 Dec 2024 15:36:37
Meditation

न्यूयॉर्क : दि. २१ डिसेंबर हा ‘जागतिक ध्यान दिवस’ ( Meditation ) म्हणून साजरा केला जावा, हा लिश्टनस्टाईन या देशाने मांडलेला आणि भारतासह अनेक देशांनी अनुमोदन दिलेला प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी एकमताने मंजूर केला, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांतील भारताचे प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी दिली. ते म्हणाले की, “दि. २१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांनी मंजूर केला. ‘वसुधैव कुटुंबकम् ’ (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) अशी भारताची धारणा आहे. माणसाच्या कल्याणासाठी सर्व जगाने एकजुटीने प्रयत्न करायला हवे, असे भारताला वाटते. जगभरात दि. २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी २०१४ साली भारताने पुढाकार घेतला होता.” त्याची आठवण करून देत पर्वतनेनी हरीश यांनी म्हटले आहे की, “जागतिक योग दिन ही गेल्या दहा वर्षांत जागतिक चळवळ बनली आहे. जगभरातील लोक योगासनांचे धडे घेत आहे. तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.”

आधुनिक काळातही ध्यानाचे महत्त्व कायम

भारताचे म्हणणे आहे की, ध्यानधारणा ही प्राचीन काळापासून विकसित झाली आहे. आजच्या आधुनिक जगातील बदलांना सामोरे जाताना आणि मानसिक शांती मिळविण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक आहे. लिश्टनस्टाईनने मांडलेल्या ठरावाला भारत, बांगलादेश, बल्गेरिया, बुरुंडी, डोमिनिकन रिपब्लिक, आइसलँड, लक्झेंबर्ग, मॉरिशस, मोनॅको, मंगोलिया, मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्लोव्हेनिया या देशांनी अनुमोदन दिले होते.

Powered By Sangraha 9.0