महाकुंभ २०२५ : सर्वसिध्दिप्रद: कुंभ:

09 Dec 2024 21:14:27
mahakumbha uttar pradesh


उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे दि. १३  जानेवारी ते दि. २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या महाकुंभ मेळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. हा महाकुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम ठरणार आहे. या कुंभमेळ्यामध्ये विविध साधू-संत, महामंडलेश्वर यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य भाविक प्रचंड संख्येने सहभागी होणार आहेत.

उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने कुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ३४ देशांच्या राजनैतिक अधिकार्‍यांना निमंत्रणे पाठविली आहेत. निमंत्रण पाठविण्यात आलेल्या देशांचे राजदूत किंवा उच्चायुक्त कुंभमेळ्याची ‘याचि देही याचि डोळा’ अनुभूती घेणार आहेत. कुंभमेळ्यासाठी नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मॉरिशस, कंबोडिया, दक्षिण कोरिया, म्यानमार, भूतान, बांगलादेश, फिजी, मलेशिया, व्हिएतनाम, अमेरिका, ब्रिटन ऑस्ट्रेलिया, रशिया, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी आणि अन्य अनेक देशांना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. भारताच्या महान सांस्कृतिक परंपरेचे दर्शन यानिमित्ताने जगातील विविध देशांच्या प्रतिनिधींना होईल. तसेच, एवढा प्रचंड सोहळा अत्यंत समर्थपणे यशस्वी करण्याची शक्ती भारताकडे आहे, याचे दर्शनही जागतिक समुदायास होईल. या महाकुंभ मेळ्यासाठी 50 कोटी भाविक येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

विविध देशांना निमंत्रणे पाठविण्याचे दोन हेतू आहेत. यामुळे धार्मिक आणि अध्यात्मिक पर्यटनास अधिक गती मिळेल आणि यानिमित्ताने विविध देशांशी भारताचे संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने आपले राज्य अग्रेसर राहील, असा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकारकडून केला जात आहेच. कुंभमेळ्यास येणारे भाविक आणि अन्य निमंत्रित अतिथी यांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारने अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. तसेच, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी 60 हजार पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहेत. प्रचंड संख्येने येणार्‍या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही, ड्रोन आदींचा वापर केला जाणार आहे. कुंभमेळ्यास येणार्‍या भाविकांसाठी एक हजार महाकुंभ विशेष रेल्वेगाड्या देशाच्या विविध भागांमधून सोडण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने यासाठी आताच हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रयागराजकडे जाणार्‍या सर्व रेल्वेमार्गांवरील स्थानके सर्व सोयींनी युक्त राहतील, अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे. तसेच, उत्तर प्रदेश परिवहन विभागाने प्रयागराजसाठी मोठ्या प्रमाणात बससेवा उपलब्ध केली आहे. प्रयागराज शहरातही पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृहे, आरोग्य सेवा आदी उपलब्ध राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग भाविक यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. या महाकुंभ मेळ्यामुळे रोजगारही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. कुंभ स्नान पर्वणीवेळी संगमस्थानी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची आयोजकाची योजना आहे.
 
अयप्पा भक्तांवर हल्ले

केरळमधील शबरीमाला येथे असलेल्या भगवान अयप्पाचे दर्शन घेण्यासाठी अयप्पाभक्तांनी व्रत राखण्यास प्रारंभ केला आहे. तसेच, यानिमित्ताने मंदिरांमध्ये भजनाचे कार्यक्रम केले जात आहेत. पण, या अयप्पा भक्तांवर हल्ले करण्याचे प्रकार आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये घडले आहेत. हे हल्ले धर्मांध मुस्लीम तरुणांनी केल्याचे दिसून आले आहे. आंध्र प्रदेशातील रायचोटी या शहरामध्ये अयप्पा भक्तांना घेऊन जात असलेल्या एका वाहनावर धर्मांध मुस्लीम जमावाने हल्ला केला. अयप्पाचे भजन गात हे सर्व भाविक जात असताना धर्मांध जमावाने बस अडविली आणि त्यावर हल्ला केला. जमावाने बसची नासधूस केली आणि भाविकांसमवेत हुज्जत घातली. याप्रसंगी स्थानिक पोलीस घटनास्थळी उपस्थित असतानाही त्यानी प्रभावीपणे हस्तक्षेप केला नाही. घटनेने दिलेल्या अधिकारांचे रक्षण करण्यामध्ये पोलीस असफल ठरले असल्याची टीका पोलीस खात्यावर करण्यात आली. असाच एक प्रकार तामिळनाडू राज्यातील तिरुवरुर जिल्ह्यातील कुठानाल्लूर या गावात घडला. अयप्पा भक्तांचा 50 जणांचा एक गट भजन करण्यासाठी स्थानिक मरिअम्मान मंदिरात जमला असता धर्मांध मुस्लिमांच्या जमावाने त्यास आक्षेप घेतला. भजन करणे इस्लामविरोधी असल्याचे सांगून त्या धर्मांध तरुणांनी हिंसाचारास प्रारंभ केला. याही ठिकाणी पोलिसांनी ‘बघ्याची भूमिका’ घेऊन हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई केली नाही. मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये हिंदू समाजावर होणारे हल्ले अत्यंत क्लेशदायी असल्याचे सांगून ‘हिंदू मुन्ननी’ या संघटनेने या हल्ल्याचा तीव निषेध केला आहे. तामिळनाडू राज्यामध्ये हिंदू समाजास सापत्नभावाची वागणूक दिली जात असून, त्या राज्यात जी जी सरकारे आली, त्यांच्याकडून मुस्लीम समाजाचे लांगूलचालन करण्याचे धोरण अवलंबिले जात आहे, असा आरोप हिंदू समाजाकडून करण्यात येत आहे.आज बांगलादेशमध्ये ज्या घटना घडत आहेत, त्यांच्याशी येथे घडणार्‍या घटनांची तुलनाही केली जात आहे. ज्या भागांमध्ये मुस्लीम समाज बहुसंख्य झाला, त्या भागात तेथील अल्पसंख्य समाजावर अन्याय करण्याचे प्रकार घडत आहेत, असे या दोन राज्यांमधील घटनांवरून दिसून येते.


हिंदूंच्या बाजूने बोलल्याबद्दल ‘शिक्षा’!

ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या आणि त्या देशामध्ये चांगली प्रतिष्ठा मिळविलेल्या दोघा भारतीय वंशांच्या नागरिकांवर ब्रिटनच्या राजघराण्याची खप्पामर्जी झाली. हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल आणि खलिस्तान चळवळीबद्दल ‘बकिंगहॅम पॅलेस’ने पुरस्कार देऊन त्यांचा जो सन्मान केला होता, तो सन्मान परत घेण्याचा निर्णय बिटिश राजघराण्याने घेतला आहे. या निर्णयाबद्दल तेथील भारतीयांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ब्रिटनमधील हिंदू काऊन्सिलचे कार्यकारी विश्वस्त अनिल भानोत आणि रमी रंगर अशी त्या दोघांची नावे आहेत. रमी रंगर यांना ‘कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ असा बहुमान प्रदान करण्यात आला होता, तर भानोत यांना ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ हा बहुमान प्रदान करण्यात आला होता. पण, ब्रिटिश राजघराण्याने या दोघांचे बहुमान काढून घेतले. हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांच्याविरुद्ध आणि खलिस्तान चळवळीविरुद्ध या दोघांनी आवाज उठवला, हाच काय तो त्यांचा गुन्हा! त्याबद्दल त्यांचा बहुमान हिरावून घेण्यात आला. राजघराण्याची ही कृती म्हणजे भाषण स्वातंत्र्यावर घाला असल्याचे नमूद करून या दोन्ही भारतीयांनी या घटनेचा निषेध केला आहे. अनिल भानोत यांच्यावर तर ‘इस्लामोफोबिया’ झाल्याचा आरोप करण्यात आला. बांगलादेशमधील हिंदू समाजावर जे अत्याचार झाले, त्या अत्याचारांकडे समाजमाध्यमाद्वारे भानोत यांनी लक्ष वेधले होते. रंगर यांनी या निर्णयाचा न्यायालयीन फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे. ‘युरोपियन मानवी अधिकार न्यायालया’त आपण हा मुद्दा नेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ब्रिटनमधील राजकीय पक्ष आणि नेते खलिस्तानी चळवळ, खलिस्तानी अतिरेकी यांच्या संदर्भात दुटप्पी भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे. ब्रिटनमधील मजूर पक्ष हा फुटीरतावाद्यांची बाजू घेत असल्याचे दिसून आले आहे. केवळ खलिस्तानवाद्यांचीच नव्हे, तर जम्मू-काश्मीरमधील फुटीर शक्तींची बाजू त्या पक्षाने घेतल्याचे दिसून आले आहे. मजूर पक्षास नेहमीच भारतीयविरोधी पक्ष म्हणून ओळखले जात आहे. ब्रिटनमध्ये इस्लामी लोकांचा मोठा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. त्या देशात किमान नऊ मुस्लीम महापौर आहेत. ब्रिटनमध्ये 50 शरिया काऊन्सिल आणि तीन हजार मशिदी आहेत. त्याशिवाय, त्या देशात 130 शरिया न्यायालये आहेत. एकीकडे मुस्लीम समाजास झुकते माप दिले जात असलेल्या ब्रिटनमध्ये दोघा भारतीयांना जो बहुमान प्रदान करण्यात आला होता, तो ब्रिटिश राजघराण्याकडून हिरावून घेण्यात आला आहे. हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांबद्दल आणि खलिस्तान चळवळीबद्दल भाष्य केल्याबद्दल एवढी कठोर शिक्षा! तीपण भाषण स्वातंत्र्याचे गोडवे गाणार्‍या ब्रिटनमध्ये! या घटनेचा जेवढा निषेध करावा, तेवढा थोडाच आहे!

 
दत्ता पंचवाघ
9869020732
Powered By Sangraha 9.0