नवी दिल्ली : बांगलादेश मध्ये अल्पसंख्यांक हिंदू समाजावर सुरू असलेले अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. या अत्याचाराच्या विरोधात भारतात जागोजागी निदर्शनं सुरू आहेत. अशातच आता भारताने चर्चेच्या दिशेने पहिले पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी सोमवार दिनांक ९ डिसेंबर रोजी धाका येथे पोहोचले असून भारत आणि बांगलादेश यांच्या मध्ये द्विपक्षीय बैठक होणार असल्याची चर्चा आहे. मुहम्मद युनुस यांच्या अंतरिम सरकारच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच भारत सरकारचे प्रतिनीधी बांगलादेशला भेट देत आहेत.
परराष्ट्र सचिवांच्या भेटी दरम्यान द्विपक्षीय बैठकीत विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती माध्यमांना मिळाली. ४ डिसेंबर रोजी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रतिनीधी शफीकुल आलम यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की दोन्ही देशांमधील परस्पर हितसंबंधावर चर्चा होणार आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे परराष्ट्र सल्लागार (मंत्री) मो. तौहीद हुसैन यांनी न्यूयॉर्कमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली होती. दरम्यान ६ डिसेंबर रोजी धाका शहराच्या परिसरातील एक मंदिर जाळण्यात आले. हिंदू अल्पसंख्यांकांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही. ईस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांच्यावर देशद्रोहचा ठपका ठेवला गेला आणि त्यांना तुरूंगात डांबून ठेवले गेले. या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील ही बैठक महत्वाची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.