मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईत विखुरलेली छोटाली हरित क्षेत्र ही जैवसंपन्न असल्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे ( brown fish owl spotted in mumbai ). घनदाट अरण्यामध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या मासेमार घुबडाचे दुर्मीळ दर्शन कुर्ला कारशेड परिसरात झाले आहे (brown fish owl spotted in mumbai). या परिसरामधून सातत्याने मासेमार घुबडाचे रेस्क्यू होत असल्याने कारशेड परिसरातील हरित क्षेत्रामध्ये या घुबडाचा अधिवास असल्याचे समोर आले आहे. (brown fish owl spotted in mumbai)
मुंबईसारख्या शहरी भागात घुबड आणि पिंगळ्याच्या काही प्रजाती सहजपणे दिसतात. त्यामध्ये गव्हाणी घुबड, ठिपकेवाला पिंगळा अशा पक्ष्यांचा समावेश होतो. मात्र, मासेमार घुबड हे प्रामुख्याने वन क्षेत्रात दिसते. घुबडांंच्या काही प्रजाती माशांची शिकार करण्यात माहिर असतात. मासेमार घुबड हा त्यापैकीच एक. घनदाट जंगलात राहणाऱ्या या प्रजातीचे वास्तव्य पाण्याजवळ आढळते. त्यामुळे मासे पकडण्याचे काम सुलभतेने होते. याच मासेमार घुबडाचा बचाव दि. ४ डिसेंबर रोजी कुर्ला रेल्वे कारशेड परिसरामधून करण्यात आला. यापूर्वी देखील फेब्रुवारी महिन्यात एक मासेमार घुबड मृत अवस्थेत आम्हाला कारशेडमध्ये सापडल्याची माहिती ज्युनिअर इंजिनिअर दिलेश शिवकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. ४ डिसेंबर रोजी जखमी अवस्थेत सापडलेल्या घुबडाला वन्यजीव बचाव संस्थेकडे सोपविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, महाराष्ट्र निसर्ग उद्यान किंवा आरे वसाहतीमध्ये हरित क्षेत्र असले तरी, त्याठिकाणाहून गेल्या काही वर्षात मासेमार घुबडाची नोंद झालेली नाही. अशा परिस्थितीत कुर्ला रेल्वे कारशेडमधून या घुबडाची नोंद होणे, अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असल्याची माहिती पक्षीतज्ज्ञ आदेश शिवकर यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. हा संपूर्ण परिसर मोकळा असून त्याठिकाणी शांतता आहे. काही प्रमाणात पाणथळ परिसर देखील आहे, त्यामुळे असा अधिवास मासेमार घुबडासाठी पूरक असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय मुंबईमध्ये शिल्लक राहिलेले अशा स्वरुपाचे हरित क्षेत्र जैवविविधतेचे भांडार असल्याचेही ते म्हणाले.