मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाकुंभमेळ्याचे निमंत्रण

08 Dec 2024 16:29:32

cm 1

मुंबई : सनातन हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व असलेला महाकुंभमेळा येत्या १३ जानेवारीपासून प्रयागराज येथे सुरू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवार, दिनांक८ डिसेंबर रोजी उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी महाकुंभमेळ्याचे निमंत्रण दिले.सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांना हे निमंत्रण देण्यात आले. यावेळी पाठक यांच्यासमावेत डॉ. संजय कुमार निषाद उपस्थित होते.

महाकुंभ २०२५ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी सहभागी व्हावे, ही इच्छा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सध्या महाकुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. या वर्षीच्या महाकुंभ मेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे. १२ वर्षांपूर्वी झालेल्या मेळाव्याला काही कोटी भाविकांनी हजेरी लावली होती. यावेळी सुद्धा ही संख्या तब्बल १० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिनांक १३ जानेवारी २०२५ ते दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ असे ४४ दिवस हा मेळा चालणार आहे. महाकुंभ मेळ्याच्या काळात शाही स्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे या काळात गंगा नदीवर भाविक लाखोंच्या संख्याने जमणार आहेत. अशावेळी दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांसोबतच अंडरवॉटर ड्रोनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हे ड्रोन ३०० मीटरपर्यंतच्या खोलीवरचा माग काढू शकतात.
 
जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा
सनातन हिंदू धर्मात कुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कुंभमेळ्यातील पवित्र स्नानानंतर मनुष्य पापांपासून मुक्त होतो असे मानले जाते. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक मेळावा आहे. पवित्र नद्यांच्या काठावर वसलेल्या चार तीर्थक्षेत्रांमध्ये कुंभमेळाव्याच्या उत्सवाचे स्थान फिरत राहते. उत्तराखंडमधील गंगेवरील हरिद्वार, मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीवरील उज्जैन, महाराष्ट्रातील गोदावरी नदीवरील नाशिक आणि उत्तर प्रदेशातील गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावरील प्रयागराज ही ठिकाणे आहेत. यामाध्ये महाकुंभमेळा हा फक्त प्रयागराजमध्येच भरतो.

 
Powered By Sangraha 9.0