खिशातल्या मोबाईलनं घेतला शिक्षकाचा जीव

07 Dec 2024 19:08:13
Mobile Explosion

भंडारा : आपल्या रोजच्या वापरात मोबाईल ( Mobile ) ही आवश्यक अशी बाब झाली आहे. प्रत्येकाचे जीवन हे मोबाईलशी निगडीत आहे. परंतु मोबाईल ही तितकीच घातक गोष्ट असल्याचे सध्याच्या काळात दिसून येत आहे. काही दिवसांपासून मोबाईलच्या स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांमध्ये जीवावर बेतण्याचे प्रसंग जास्त प्रमाणात घडून येताना दिसत आहेत. अशीच घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. नातेवाईकांच्या कार्यक्रमाला जाताना खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने एका शिक्षकाला त्याचा जीव गमवावा लागला आहे.

भंडारा जिल्ह्यात खिशात मोबाईलचा स्फोट झाला आणि जागीच शिक्षकाचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुरेश संग्रामे असे त्या शिक्षकाचे नाव होते. शिक्षकाच्या शेजारी बसलेल्या वृद्धालादेखील गंभीर दुखापत झाली आहे. त्या वृद्धाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नत्थू गायकवाड असे त्या वृद्ध व्यक्तिचे नाव आहे. शिक्षक व वृद्ध व्यक्ती हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

शिक्षक सुरेश संग्रामे हे साकोला तालुक्यातील सिरेगावटोला या गावातील रहिवासी आहेत. अर्जुनी मोरगाव येथे शिक्षक व नत्थू गायकवाड दोघेही नातेवाईकांच्या एका कार्यक्रमाला जात होते. नातेवाईकांकडे जात असताना संग्रामे यांचा मोबाईल खिशात होता आणि अचानक खिशात हा स्फोट झाला. त्यामध्ये संग्रामे यांचा जागीच मृत्यू झाला तर, नत्थू गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे संग्रामे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोबाईलची बॅटरी जास्त गरम झाल्याने ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

Powered By Sangraha 9.0