ढाका : (Pakistan Embassy) बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंविरोधातील अमानवी हिंसाचारामागे पाकिस्तानचा हात असल्याचे समोर आले आहे. हिंदूंविरोधात हिंसाचाराच्या घटनांची गुन्हेगार बांगलादेशची कट्टरवादी धर्मांध संघटना जमात-ए-इस्लामीला पाकिस्तानची फूस असल्याचे समजते आहे.
ढाक्यातील पाकिस्तानचे दूतावास हे धर्मांधाचे केंद्र बनले आहे. बांगलादेशातील शेख हसीना सरकार पडल्यानंतर प्रथमच पाक उच्च आयोगात जमात-ए-इस्लामी आणि खिलाफत मजलिस या दोन्ही कट्टरवादी धर्मांध संघटनांसोबत बैठकांचे सत्र सुरू आहेत. हिंदू-बौद्ध-ख्रिश्चन कौन्सिलच्या म्हणण्यानुसार ऑगस्टपासून ते आतापर्यंत हिंदूंवरील हल्ल्याच्या तीन हजारांहून अधिक घटनांचे कट याच दूतावासात रचले गेले आहेत.
दरम्यान यूनुस सरकारला पाठिंबा देणारा पाकिस्तान समर्थक खालिदा झिया यांच्या बीएनपी पक्षाने गुरुवारी भारतीय साड्यांची होळी केली. बीएनपीच्या भारतविरोधी अभियानांतर्गत भारतीय सामानावर बहिष्कार घालण्यासाठी बांगलादेशातील अनेक शहरांत निदर्शेने केली जात आहेत. ढाका, चितगाव आणि मेयमनसिंह विद्यापीठात कट्टरवादी विद्यार्थी संघटनांनी भारतविरोधी सभाही घेतल्याची माहिती आहे. तसेच भारत- बांगलादेशच्या मैत्रीची प्रतिके असलेली स्मारके उद्धवस्त करण्यात आली आहेत.
युनूस सरकारचे लांगूलचालन
बांगलादेशात घटनात्मक वैधता नसतानाही अंतरिम सरकारमध्ये मोहम्मद युनूस हे पंतप्रधान बनले तरी ते नाममात्र प्रमुख आहेत. ते केवळ लष्कर-मुल्ला युतीचा नागरी चेहरा आहेत. त्यामुळे बांगलादेशात हिंसाचार वाढण्याची कारणे अगदी स्पष्ट आहेत. युनूस सरकारने दहशतवाद्यांशी संलग्न असलेल्या जिहादी संघटनांवरील बंदी उठवली. इस्लामिक कट्टरवाद्यांना खूश करण्यासाठी त्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही.
दुसरा ‘पाकिस्तान’
धर्मांध कट्टरपंथीयांच्या वाढत्या हिंसाचारामुळे अस्थिर बांगलादेश हा दुसरा ‘पाकिस्तान’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर बांगलादेशने पाकिस्तानातून २५ हजार टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. कराचीहून चितगावला जानेवारीत ही साखर पोहचणार असल्याची माहिती आहे. गेल्या ५३ वर्षात हे असे पहिल्यादांच घडत आहे.