डॉ. श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे नवे सचिव

07 Dec 2024 17:09:16
Shreekar Pardeshi

मुंबई : 'झिरो पेंडंन्सी'साठी परिचित असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात सचिव ( Secretary ) पदावर करण्यात आली आहे. याआधी ते उपमुख्यमंत्री कार्यालयात सचिव पदावर कार्यरत होते.

पंतप्रधान कार्यालयातील प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यावर जून २०२१ मध्ये श्रीकर परदेशी महाराष्ट्रात परतले. त्यावेळी सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र महायुती सरकार सत्तेवर येताच त्यांच्याकडे उमुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिव पदाचा कार्यभर सोपवण्यात आला आहे.

श्रीकर परदेशी हे मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळचे. एमबीबीएस-एमडी शिक्षण पूर्ण करत काही काळ त्यांनी प्रॅक्टिसही केली. २००१ साली यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांनी महाराष्ट्रातून पहिले येण्याची किमया साधली होती. श्रीकर परदेशी यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून अनेक जिल्ह्यात काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही त्यांच्या कामाची भुरळ पडली. त्यानंतर त्यांना थेट राजधानी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्त करण्यात आले होते.

बुलडोझर मॅन!

पिंपरी चिंचवड आयुक्तपदावर असताना वीसमजली इमारतींचे अतिक्रमण त्यांनी जमीनदोस्त केले, तेव्हा नागरिकांनी त्यांना 'बुलडोझर मॅन' अशी उपमा दिली होती. त्यांनी राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी हा किताबही पटकावला आहे.

Powered By Sangraha 9.0