भारतातील गंगा नदी ही ज्ञानदात्री आहे, तर यमुना नदी भक्ताला निखळ आनंदाची अनुभूती देते. सरस्वती नदी ही वैराग्यदायिनी मानली आहे. मात्र, मानवी आयुष्याला परिपूर्ण करणारी ज्ञान, आनंद आणि वैराग्याची अनुभूती नर्मदा नदी देते, अशी अनेक साधकांची अनुभूती आहे. त्यामुळेच, अनेक साधक, भाविक, श्रद्धाळू परिक्रमेद्वारे नर्मदेच्या कृपाशीर्वादास प्राप्त होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. असेच नर्मदा परिक्रमेचे अध्यात्मिक अंगाने भावपूर्ण वर्णन करणारे जयंत कुलकर्णी लिखित ‘नर्मदा परिक्रमा : एक अध्यात्मिक अनुभूती’ हे पुस्तक होय.
स्वर्गापेक्षाही सुंदर असलेल्या या भारतभूमीला कायमच देवतांना प्रिय असणारी अध्यात्म, ज्ञान यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघालेली भूमी म्हणून मान्यता मिळालेली आहे. भारताचे सौंदर्य हे अतुलनीय आहे. म्हणून देवतांनाही वारंवार याच भूमीवर अवतार घेण्याचा मोह आवरला नसल्याचे लक्षात येते. उत्तरेला मुकुटासारखा असलेला हिमालय, तर दक्षिणेला भारतमातेच्या चरणकमलांना स्पर्श करणारा अथांग सागर भारतमातेच्या सौंदर्यवैभवात भरच घालतात. मात्र, या भारतभूमीचे खरे सौंदर्य कोणामुळे वाढले असेल, तर ते भारतमातेच्या अंगाखांद्यांवरून वाहणार्या नद्यांमुळेच. भारतातील नद्या फक्त एक जलप्रवाह नसून, अनेक संस्कृतींचा जन्मच या नद्यांच्या अस्तित्वाशी निगडित आहे. त्यामुळेच भारतात नद्यांना आईचा दर्जा मिळणे साहजिकच. जसे या नद्यांचे भौगोलिक महत्त्व आहे, तसेच त्यांचे अध्यात्मिक महत्त्वदेखील आहे. भारतातील गंगा नदी ही ज्ञानदात्री आहे, तर यमुना नदी भक्ताला निखळ आनंदाची अनुभूती देते. सरस्वती नदी ही वैराग्यदायिनी मानली आहे. मात्र, मानवी आयुष्याला परिपूर्ण करणारी ज्ञान, आनंद आणि वैराग्याची अनुभूती नर्मदा नदी देते, अशी अनेक साधकांची अनुभूती आहे. त्यामुळेच, अनेक साधक, भाविक, श्रद्धाळू परिक्रमेद्वारे नर्मदेच्या कृपाशीर्वादास प्राप्त होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. असेच नर्मदा परिक्रमेचे अध्यात्मिक अंगाने भावपूर्ण वर्णन करणारे जयंत कुलकर्णी लिखित ‘नर्मदा परिक्रमा : एक अध्यात्मिक अनुभूती’ हे पुस्तक होय.
सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं
द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतम्।
कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे॥
नर्मदा नदीचे केलेले ‘नर्मदाष्टकम्’मधील वर्णन यथार्थच म्हणावे लागेल. याच नदीच्या तीराने केलेल्या परिक्रमेचे वर्णन जयंत कुलकर्णी यांच्या पुस्तकामध्ये केले आहे. सामान्यपणे प्रत्येकजण जमेल त्या पद्धतीने परिक्रमेचे वर्णन शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे बहुतांशी वेळा त्यात येणारा तोचतोचपणा टाळण्याचा प्रयत्न जयंत कुलकर्णी यांनी त्यांच्या ‘नर्मदा परिक्रमा : एक अध्यात्मिक अनुभूती’ या पुस्तकात केला आहे. जयंत कुलकर्णी यांच्या परिक्रमेमागे सद्गुरू भगवान दत्तात्रय आणि त्यांच्या गुरूंच्या प्रेरणेने या परिक्रमेला सुरुवात केली. दि. २१ डिसेंबर २०२१ ते दि. २३ एप्रिल २०२२ या कालखंडात संपूर्ण 3 हजार, 500 किमीची परिक्रमा चालत पूर्ण केली. या प्रवासादरम्यान आलेले अनेक अध्यात्मिक अनुभूतीचे शब्दचित्र म्हणजे जयंत कुलकर्णी यांचे पुस्तक होय.
या पुस्तकाच्या सुरुवातीसच जयंत कुलकर्णी यांनी हे पुस्तक त्यांचे गुरू आणि आईवडील यांच्या चरणी समर्पित केले आहे. त्यानंतर या पुस्तकाला करवीर पीठाचे शंकराचार्य, श्री शरद शास्त्री जोशी महाराज आणि शिरीष शांताराम कवाडे यांनी पत्ररुपाने केलेले कौतुक आणि दिलेला आशीर्वाद वाचकांचे लक्ष वेधून घेतात. प्रा. नम्रता भट यांचा ‘नमामि देवी नर्मदे’ हा लेखही नर्मदा नदीचा महिमा विशद करणारा आहे. जयंत कुलकर्णी यांनी या पुस्तकामध्ये परिक्रमा करू इच्छिणार्या साधकांच्या प्रश्नांचा मागोवा घेत त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या पुस्तकाच्या वाचनाने मनात परिक्रमेची तीव्र इच्छा असणार्या मात्र, नर्मदामाईबाबत संपूर्ण अनभिज्ञ असणार्या श्रद्धाळूंनादेखील संपूर्ण ज्ञानप्राप्ती हे पुस्तक करून देईल, याविषयी कोणतीही शंका नाही. मुळातच, नर्मदा नदीचा इतिहास ते तिच्या काठावरील अध्यात्मिक अनुभव याचे रसाळ, भावविभोर वर्णन या पुस्तकात आले आहे. त्यामुळे साहजिकच या पुस्तकाला पूर्णत्व प्राप्त झाले आहे. जर फक्त प्रवासवर्णन असते, तर अध्यात्मिक बाबींसाठी वाचकाला अन्य शोध घेणे क्रमप्राप्त ठरले असते किंवा फक्त अध्यात्मिक अनुभूतींचे वर्णन असते, तर सामान्य श्रद्धावानाला नर्मदेच्या परिसराची माहिती त्यातून मिळणे दुरापास्तच झाले असते. त्यामुळे अध्यात्माचा मुख्य धागा न सोडता, दोन्हींचा समन्वय साधण्याचे शिवधनुष्य लेखकाने लीलया पेलल्याचे दिसून येते. मात्र, असे असले तरी लेखकाची वृत्ती अध्यात्मिक असल्याने, तसेच नैमित्तिक उपासना पद्धतीवरचा विश्वास यांमुळे या परिक्रमेत घडणार्या लहान लहान घटनांकडे बघण्याचा लेखकाचा सश्रद्ध दृष्टिकोन मानवी मनाचा ठाव घेणारा आहे. या संपूर्ण पुस्तकात लेखकाला परिक्रमेदरम्यान भेटलेल्या सत्पुरुषांची छायाचित्रे आणि माहिती लेखकाने वाचकांसाठी नि:स्वार्थपणे प्रस्तुत केली आहे. त्याचा फायदा नक्कीच हे पुस्तक वाचून परिक्रमा करण्यात उद्युक्त होणार्या नर्मदामाईच्या लेकरांना होणार आहे, यात तीळमात्र शंका नाही.
या पुस्तकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, अध्यात्मिक अंगाने आलेल्या अनुभूती लिहिताना लेखकाने लेखनाची भाषा ही सामान्यांना सहज समजेल अशीच वापरलेली आहे. यातूनच हे पुस्तक आपण कोणासाठी लिहित आहोत, याचे लेखकाला असलेले भान अधोरेखित होते. साधरणतः अध्यात्म हा विषय सामान्यांपासून थोडा दूर राहिला, त्यामागील प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे भाषिक क्लिष्टता होय. वाचकांना समजण्यासाठी अलंकारिक किंवा अध्यात्म निरुपणासाठी आजवर नित्याच्या भाषेचा मोह लेखकाने प्रयत्नपूर्वक टाळला आहे. त्यामुळेच हे पुस्तक वाचकाभिमुख झाले आहे. लेखकाने पुस्तकात प्रकर्षाने टाळलेला दोष म्हणजे मोठ्या आकाराचे लेख होय! यामुळे बरेचदा वाचक पुस्तकापासून दूर जातात. त्यामुळे लेखकाने प्रकर्षाने लेखाचे आकारमान त्याचा विस्तार अल्प ते मध्यम स्वरुपाचा ठेवला आहे. तसेच, या पुस्तकात नित्यपठण करण्यास योग्य असे ‘नर्मदाष्टकम्’ नर्मदामाईची आरती यांचाही समावेश केला आहे. तसेच, लेखकाला नर्मदामाई कशी भावली, याचेदेखील वर्णन पुस्तकात केले आहे.
अशा या नर्मदा परिक्रमेवर आदर्श असलेल्या पुस्तकाची पहिली मराठी आवृत्ती दि. २६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रकाशित केली, तर दुसरी आवृत्ती दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली. पुस्तकाचे मुखपृष्ठही नर्मदामाईचा तीर, नर्मदामाईचे प्रसन्नवदन असलेले छायाचित्र आणि तिच्या मंदिराचा सुरेख वापर करून सजवलेले दिसते. तसेच, पुस्तकाच्या आतमध्येही अनेक सत्पुरुषांचा, त्याचप्रमाणे परिक्रमेदरम्यान दिसणार्या अनेक मंदिरांच्या, आश्रमांच्या छायाचित्रांचाही सुरेख वापर केला असून, त्यामुळे साहजिकच वाचकाच्या आकलनात वृद्धी होते. जितके पुस्तकाचे मुखपृष्ठ सुंदर आहे, तितकेच सुंदर पुस्तकाचे मलपृष्ठदेखील साकारण्यात लेखकाला यश आले आहे. त्यामुळेच, नर्मदा परिक्रमेविषयी उपलब्ध साहित्यामध्ये वेगळा विषय सुलभरित्या हातळाल्याने हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरले, यात शंका नाही.
पुस्तकाचे नाव : ‘नर्मदा परिक्रमा : एक अध्यात्मिक अनुभूती’
लेखक : जयंत कुलकर्णी
संपादन मांडणी : प्रा. नम्रता भट
मुखपृष्ठ : निलिमा प्रिंट सोल्युशन, ठाणे
पृष्ठसंख्या : १९२
देणगी मूल्य : २२५ रुपये
कौस्तुभ वीरकर