महाविकास आघाडीला आणखी एक दणका! संपूर्ण पक्षच मविआतून बाहेर

07 Dec 2024 13:57:06
 
MVA
 
मुंबई : समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर संशय घेत समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
 
शनिवार, ७ डिसेंबर रोजी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. मात्र, विरोधी पक्षांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत या शपथविधीवर बहिष्कार टाकला. परंतू, समाजवादी पक्षाच्या आमदारांनी महाविकास आघाडीची ही भूमिका नाकारत आमदारकीची शपथ घेतली.
 
हे वाचलंत का? -  शपथविधीलाही विरोधकांचा गोंधळ! अधिवेशनातून काढता पाय
 
त्यानंतर अबु आझमींनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे जाहीर केले. "निवडणूकीत पराभव झाल्यानंतर शिवसेनेने (उबाठा) पुन्हा एकदा आपली भूमिका बदलली आहे. माझा हिंदूत्वाचा मुद्दा कायम राहील, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच बाबरी मशीद पाडणाऱ्यांचे मी अभिनंदन करतो असे म्हणून ते आमच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. त्यामुळे अशा लोकांशी मी कधीही राहू शकत नाही. शरद पवार आणि काँग्रेसनेही त्यांच्यासोबत राहण्याबाबत विचार करावा.या निर्णयाबाबत मी अखिलेश यादव यांच्याशी बोलणार असून आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत राहू शकणार नसल्याची भूमिका त्यांना सांगणार आहे. इंडिया आघाडीसोबत राहायचे की, नाही याबद्दलचा निर्णय अखिलेश यादव घेतील," असेही सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0