जागतिक बँक महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे

05 Dec 2024 22:18:11

world bank


मुंबई, दि.५ : विशेष प्रतिनिधी 
महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा जाहीर होताच जागतिक बँकेने महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे. जागतिक बँकेकडून महाराष्ट्रासाठी कर्ज मंजूर झाले आहे. आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अधिक जिल्ह्यांना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या पुढाकाराला जागतिक बँक पाठिंबा देईल, असा विश्वास जागतिक बँकेने महाराष्ट्राला दिला आहे. जागतिक बँकेने प्रसिद्धीपत्रक काढत ही माहिती दिली आहे.

जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने संपूर्ण महाराष्ट्रातील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्याला मदत करण्यासाठी नवीन कर्ज मंजूर केले. विकासाच्या संधी ओळखण्यासाठी, खाजगी क्षेत्राचा सहभाग सुलभ करण्यासाठी, प्रकल्प नियोजन आणि निर्णय घेण्यासाठी, डेटा वापराने जिल्हा प्रशासनाची क्षमता बळकट करण्यासाठी जागतिक बँकेचा हा कार्यक्रम मदत करेल. जागतिक बँकेने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची $५००अब्ज राज्याची अर्थव्यवस्था ही देशातील सर्वात मोठी आहे. महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनासाठी राज्याच्या अर्थव्यवस्थेत अधिकाधिक जिल्ह्यांनी त्यांचे योगदान वाढवणे आवश्यक आहे. यामुळे एकूणच आर्थिक विकासाला चालना मिळेल आणि खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित होतील. तसेच जिल्ह्यात राहणारे लोक या वाढीव संधींचा लाभ घेतील. विकास कामांना गती देण्यासाठी आणि संस्थात्मक क्षमता बळकट करण्यासाठी US$ १८८.२ दशलक्ष मंजूर केले आहेत. जिल्हा नियोजन आणि विकास धोरणांना यामुळे मदत होईल. या मोहिमेअंतर्गत गुंतवणुकीमुळे जिल्ह्यांना आवश्यक डेटा, निधी आणि कौशल्ये उपलब्ध होतील. ज्यामुळे विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल.

“जिल्हा स्तरावर संस्थात्मक क्षमता आणि समन्वयामध्ये सुव्यवस्थित गुंतवणूक केल्याने कार्यक्रम नियोजन आणि धोरणनिर्मिती, खाजगी क्षेत्रासह सार्वजनिक क्षेत्रातील कार्यक्षम इंटरफेस आणि जनतेला सुधारित सेवा प्रदान करेल. विशेषत: पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांचा विकास यामागची उद्देश आहे. हा कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये उच्च आणि अधिक संतुलित विकास साधण्याच्या राज्याच्या उद्दिष्टात योगदान देईल.,” असे भारतासाठी जागतिक बँकेचे कंट्री डायरेक्टर ऑगस्टे तानो कौआमे म्हणाले.
 
Powered By Sangraha 9.0