वॉशिंग्टन डी.सी. : (Bangladeshi Hindus) बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने होत असलेले हल्ले तसेच बांगलादेशातील हिंदू धर्मगुरु इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांना झालेली अटक या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेतील राज्य विभागाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना बांगलादेशमधील अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांबाबत मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी धार्मिक आणि मूलभूत मानवी हक्कांसह मूलभूत स्वातंत्र्यांचा आदर करण्याचे आवाहन केले.
पटेल म्हणाले की, सरकारने कायद्याच्या राज्याचा आदर करणे आवश्यक आहे, त्यांनी मूलभूत मानवी हक्कांचा आदर करणे आवश्यक आहे. या गोष्टीवर आम्ही नेहमीच भर देत राहू. कोणत्याही प्रकारची निदर्शने असली तरी ती शांततापूर्ण असावीत. अटकेत असलेल्या लोकांनाही योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवे आणि त्यांना मूलभूत स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांची वागणूक मिळायला हवी.
अल्पसंख्याकांचे संरक्षण ही बांग्लादेश सरकारची जबाबदारी : ज्येष्ठ अमेरिकन काँग्रेस सदस्य ब्रॅड शर्मन
यूएस काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शर्मन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अल्पसंख्याक हिंदूचे संरक्षण करणे ही बांगलादेशच्या अंतरिम सरकारची जबाबदारी आहे. तसेच हिंदूंवरील वाढते हल्ले आणि अन्यायाच्या पार्श्वभूमीवर हजारो हिंदूंनी काढलेल्या निषेधमोर्च्यांवर योग्य तोडगा काढण्याची जबाबदारी बांगलादेशच्या अंतरिम सरकारची आहे, असेही त्यात म्हटले आहे.