नवी दिल्ली : दिल्लीतील जामा मशिदीच्या ( Jama Masjid ) पायऱ्यांवर हिंदू मंदिरांचे अवशेष असल्याचा दावा करून मशिदीचे पुरातत्त्व सर्वेक्षण करावे, असे पत्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षणास (एएसआय) लिहिण्यात आले आहे.
दिल्लीतील जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी करणारे पत्र एएसआयच्या महासंचालकांना लिहिले आहे. मुघल आक्रमक औरंगजेबाने जोधपूर आणि उदयपूरची कृष्ण मंदिरे उद्ध्वस्त करून दिल्लीतील जामा मशिदीच्या पायऱ्यांवर त्यांची मूर्ती बसवली होती, असे म्हटले जाते. साकी मुस्ताक खान यांचे औरंगजेबावरील मसिर-ए-आलमगिरी हे पुस्तक यावर आधारित आहे. हिंदू सेना या संघटनेचे प्रमुख विष्णु गुप्ता यांनी हे पत्र लिहिले आहे.
विष्णू गुप्ता यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, जोधपूर आणि उदयपूरमधील शेकडो मंदिरे पाडल्यानंतर औरंगजेबाने हिंदूंचा अपमान करण्यासाठी त्यांचे अवशेष दिल्लीतील जामा मशिदीच्या पायऱ्यांवर बसवले. जामा मशीद एएसआयच्या नियंत्रणाखाली असून त्यामागील सत्य शोधण्यासाठी त्यांनी सर्वेक्षण करावे. मशिदींच्या पायऱ्यांखाली गाडलेले मंदिरांचे अवशेष पाहून हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात. दिल्लीतील जामा मशिदीचे एएसआय सर्वेक्षण करून त्या मूर्ती बाहेर काढून मंदिरांमध्ये स्थापित कराव्यात, अशी हिंदू सेनेची इच्छा आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मुघल आक्रमक औरंगजेबाच्या क्रौर्याचे आणि मंदिरांच्या विध्वंसाचे सत्यही जगासमोर येणार आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.