२०२४ भारतीय अर्थव्यवस्थेची विकासयात्रा

    31-Dec-2024
Total Views |
Indian Economy

भारतीय अर्थव्यवस्थेची विकासयात्रा सुरूच असून, येत्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ६.५ टक्के दराने वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागतिक अनिश्चितता आणि महागाईचा असलेला धोका कायम असतानाही, वाढीचा हा वेग दिलासादायक असाच आहे. २०२४ या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने साधलेला विकास अनन्यसाधारण असाच!

यंदाच्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग हा ६.५ टक्के इतका असेल. गेल्या वर्षी ती ८.२ टक्के या दराने वाढली. त्यामुळे तुलनेने तो कमी असला, तरी जागतिक अनिश्चितता आणि महागाईचा असलेला धोका या पार्श्वभूमीवर हा दरही दिलासादायक असल्याचे मानले जाते. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वेग ५.४ टक्के इतका राहिला. तथापि, सकल देशांतर्गत उत्पादन ६.५ टक्के राहील, अशी वित्त मंत्रालयाला अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर वर्षभरात जागतिक आव्हानांचे संकट वाढलेले असताना, भारतीय अर्थव्यवस्थेने जी लवचिकता दाखवली आणि वाढीचा दर कायम राखला, तो कौतुकास्पद असाच आहे.

भारताने २०२४ साली जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ या कालावधीत भारताची वाढ ८.२ टक्के इतक्या मजबूत दराने झाली. आता विविध वित्तीय संस्थांच्या अंदाजानुसार, ती ७ ते ७.८ टक्के राहील, असे म्हटले जाते. जागतिक स्तरावर भारत ही जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली असली, तरी क्रयशक्ती समतेवर आधारित ‘जीडीपी’मध्ये ती तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसर्‍यांदा निवडून येत, धोरण सातत्य राखल्याने, आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळाली आहे. पायाभूत सुविधांसाठी जी विक्रमी तरतूद करण्यात आली आहे, ती भारताच्या वाढीचा वेग सुनिश्चित करणारी अशीच आहे. त्याचवेळी विविध क्षेत्रांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून भारताची डिजिटल अर्थव्यवस्था वेगाने विस्तारत आहे.

जागतिक आव्हानांना न जुमानता, भारताने उच्च विकासाचा मार्ग यशस्वीपणे राखला असून, जागतिक आर्थिक वाढीचा प्रमुख चालक म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. भारताने लक्षणीय विदेशी थेट गुंतवणुकीला आकर्षित करणे सुरू ठेवले आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम असल्याचे दिसून येते. देशाने डिजिटलायझेशनमध्ये लक्षणीय प्रगती केली असून, ‘डिजिटल इंडिया’सारख्या उपक्रमांनी डिजिटल समावेश आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाने देशांतर्गत उत्पादनाला चालना दिली असून, आयातीवरील अवलंबित्व कमी केले आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि देशांतर्गत आव्हाने कायम असताना मजबूत देशांतर्गत मागणी, संरचनात्मक सुधारणांवर केंद्रित केलेले लक्ष आणि डिजिटलायझेशनमधील प्रगती देशाला प्रगतीपथावर नेणारी ठरणार आहे.

भारत ही सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहिली. जागतिक बँकेनुसार, सार्वजनिक पायाभूत गुंतवणुकीमुळे आणि रिअल इस्टेटमधील घरगुती गुंतवणुकीत वाढ झाल्याने विकासाला चालना मिळाली. चालू खात्यातील तूट कमी झाल्यामुळे तसेच, विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिल्यामुळे विदेशी गंगाजळी ऑगस्टच्या सुरुवातीला ६७०.१ अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. आव्हानात्मक जागतिक परिस्थितीमध्ये, जागतिक बँकेने भारताचा मध्यम-मुदतीचा दृष्टिकोन सकारात्मक राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ‘कोरोना’नंतर भारतासाठी अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. चीनमधील मंदी भारताच्या पथ्यावर पडली असून, ‘जगाचा पुरवठादार देश’ अशी भारताची नवी ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित होत आहे. ‘नॅशनल लॉजिस्टिक धोरण’ आणि व्यापार खर्च कमी करणार्‍या डिजिटल उपक्रमांद्वारे भारताने आपली स्पर्धात्मकता वाढवली आहे. यावर जागतिक बँकेच्या अहवालात भर देण्यात आला आहे.

उच्च चलनवाढ आणि जागतिक अनिश्चिततेचा सामना करत असूनही, भारतीय अर्थव्यवस्थेने २०२४ साली उल्लेखनीय कामगिरी केली. विदेशी गंगाजळीचा विक्रमी साठा आणि थेट विदेशी गुंतवणुकीचा विक्रमी प्रवाह या वर्षात भारताने पाहिला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार, १६.०२ ट्रिलियन डॉलर्सच्या ‘जीडीपी’सह क्रयशक्ती समवेत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरला. यात चीन आणि अमेरिका भारताच्या पुढे आहेत. २०३० सालापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होणार असल्याचा अंदाज प्रमुख वित्तीय संस्थांनी यापूर्वी वेळोवेळी वर्तवला आहे. “भारताचा विकास दर सात टक्क्यांवर पोहोचेल. तसेच, २०२५-२६ आणि २०२६-२७ सालच्या या आर्थिक वर्षातही भारताची कामगिरी मजबूत राहील,” असे जागतिक बँकेने म्हटले आहे. जागतिक पातळीवर भारत हा आज एक महत्त्वपूर्ण देश म्हणून ओळखला जात असून, भारताने आपला आर्थिक पाया मजबूत करण्याचे धोरण कायम ठेवले आहे. म्हणूनच, विविध आंतरराष्ट्रीय निर्देशांकांवर भारताला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. आज २०२४ साल संपत असताना, ३.९४ ट्रिलियन डॉलर्ससह भारत ही जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था ठरला आहे. भारतीय लष्कर जगात चौथ्या क्रमांकाचे असून, भारताकडे ८४०.७६ टन इतका सुवर्णसाठा आहे, जो जगातील आठव्या क्रमाकांचा आहे. बाजारमूल्यानुसार, भारतीय शेअर बाजार हा जगातील सर्वात मोठा पाचवा शेअर बाजार आहे. ५० लाख,५५ हजार,१६३.०२ डॉलर्स इतके त्याचे मूल्य आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. जागतिक महासत्ता म्हणून उदयास येण्यासाठी भारताला अत्यंत अनुकूल अशी स्थिती असून, भारतावरील कर्जाचा बोजा तुलनेने कमी आहे. पुढील दहा वर्षांत भारताची प्रत्यक्षातील वाढ ही ६.३ टक्के या मजबूत दराने होईल आणि त्यामुळेच तो येणार्‍या दशकात जागतिक महासत्ता म्हणून उदयास आलेला असेल, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे. पायाभूत सुविधांसाठी भारत करत असलेला खर्च आणि त्याने लष्करी खर्चात केलेली वाढीव गुंतवणूक भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर पत वाढवतात, त्याचवेळी राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करतात.

भारत हा व्यापार तसेच, गुंतवणुकीसाठी एक आकर्षक पर्याय म्हणून उदयास येत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे हे यश तिची आर्थिक लवचिकता तसेच, वाढीच्या क्षमतेचा पुरावा म्हणून मानला जाईल. जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीला मर्यादा आलेल्या असताना, भारताने केलेली कामगिरी ही म्हणूनच कौतुकास्पद ठरते. जगातील प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताची प्रस्थापित होत असलेली ओळख भारताची विकासयात्रा सुरू ठेवणारी आहे.

संजीव ओक