वैचारिक वसाहतवादाच्या विळख्यातून सुटताना

31 Dec 2024 22:23:50
escaping the grip of ideological colonialism


देशाला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्षे झाली. याकाळात देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली असली, तरी काही क्षेत्रात देश आजही परकीय विचारांची वसाहतच आहे. वैचारिक वसाहतवादातून बाहेर पडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आलेच नाही. त्यामुळेच गेली 75 वर्षे हा वसाहतवाद देशात आहे. या वसाहतवादी विळख्याचा परिचय करण्यासाठी घेतलेला आढावा...

2022 साली भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली. सर्व भारतीयांनी ते वर्ष ‘अमृत महोत्सवी’ वर्ष म्हणून, मोठ्या उत्साहात साजरे केले. भारताच्या मानबिंदूंचे प्रदर्शन करणार्‍या अनेक कार्यक्रमांचे आयोजन, त्यानिमित्त सर्वत्र केले गेले. त्यानंतरची वर्षे आपण अमृतकाळाच्या संकल्पनेत साजरी करीत आहोत. या सर्व भविष्यगामी कार्यक्रमांकडे पाहताना, काही ऐतिहासिक घटनाही अटळपणे आपल्यासमोर येत राहतात. 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे मातृभूमीच्या विभाजनासोबत स्वीकारावे लागले आहे आणि ही जखम अधिकाधिक अशांतता निर्माण करत दिवसेंदिवस चिघळतेच आहे. 1975 सालची आणीबाणी, नंतर शीख हत्याकांड, काश्मिरी पंडितांचे स्थलांतर, नवनवीन समाजघटकांच्या आरक्षणाच्या मागण्या, कृषी कायद्यांच्या विरुद्ध झालेले हिंसक आंदोलन यांसारखे अनेक प्रश्न, देशासमोर आ वासून उभे आहेत. 1971 साली पाकिस्तानचे दोन तुकडे करून निर्माण केलेला बांगलादेश, आज रक्तबीज राक्षसासारखा अराजकतेकडे जाऊन तिथल्या हिंदूंचे जीवन कष्टप्रद बनवत आहे. हे सर्व पाहताना, ज्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आयुष्य वेचले, ते हेच स्वातंत्र्य का? हा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही.

समाजापुढे उभे राहणारे हे प्रश्न पाहून हळहळ व्यक्त करणे किंवा प्राप्त परिस्थितीत देशाला अधिकाधिक पुढे नेण्याचा प्रयत्न करणे, हे दोनच पर्याय आपल्यापुढे असल्यासारखे वाटतात. पण, या प्रश्नांना चिरस्थायी उत्तरे शोधायची असतील, तर या घटनांच्या मुळाशी असणार्‍या आपल्या समाजविषयक आकलनाला तपासून पाहण्याचा तिसरा मार्ग चोखाळणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. स्वातंत्र्य मिळाले म्हणजे, एतद्देशीय लोकांना त्यांचे सरकार निवडण्याची सुविधा मिळाली आणि त्याद्वारे आपणास धार्जिणे कायदे करता येऊ लागले, हा स्वातंत्र्याचा मर्यादित अर्थ झाला. पण, अधिक खोलात गेलो, तर एतद्देशीय म्हणजे नेमके कोण? या सर्व लोकांनी मिळून कशासाठी एकत्र यायचे आणि सरकार बनवायचे? ज्या भारताचे आपण नागरिक आहोत, असे आपण स्वाभाविकपणे गृहीत धरतो, त्या आपल्या भारतीयत्वाचे आधारभूत तत्त्व कोणते? या प्रश्नांचा आपण कधी विचार केला आहे काय?
थोडा नीट विचार केला तर आपल्या लक्षात येते की, असे अनेक प्रश्न आपण बरेचदा सोडूनच देत असतो. भारतीयत्वाची आपली अशी व्याख्या आपण कधी बनवलेलीच नसते. मग भारतात राहणारे, नागरिकत्व असलेले, संविधानास प्रमाण मानणारे अशा एकाहून एक सुधारित व्याख्या आपल्या मनात येऊ लागतात. पण नंतर हेही लक्षात येते की, या व्याख्येसाठी आपण जी प्रमाण घटना धरली उदाहरणार्थ भारताचे स्वातंत्र्य, ते मिळण्यापूर्वीही भारत होताच. मग भारतीय नागरिक असलेले जर भारतीय, तर 1947 सालापूर्वी जन्मलेले आपले आजोबा किंवा पणजोबा भारतीय नव्हते काय?

आता आपले प्रश्न अधिक खोलात जाऊ लागले. भारतीय म्हणजे कोण? आपल्या समाजाचे नेमके स्वरूप काय? आपला ऐतिहासिक वारसा कोणता? आपली राष्ट्रसंकल्पना काय? या व अशाच अनेक प्रश्नांना आता आपल्याला मुळातून भिडावे लागेल. थोडक्यात म्हणजे, आपल्या सामाजिक स्वत्वाचा आत्मबोध नव्याने करून घ्यावा लागेल. पण, आत्मबोधाची विस्मृती मुळात आपल्या समाजाला का झाली? परकीय आक्रमणे आपल्या भारत देशासाठी काही नवीन नव्हती. ब्रिटिश आक्रमणापूर्वी साधारण आठशे ते हजार वर्षे मुसलमानी राजवटींची आक्रमणे, भारताने नुसती सोसलीच नव्हती, तर ती यशस्वीपणे परतवलीही होती. मात्र, ब्रिटिश आक्रमणाने भारतीय समाजावर असे काही मूलभूत आघात केले आहेत, जे भरून येणे अजूनही शक्य झालेले नाही. किंबहुना असे काही परिणाम झाले, हेच लक्षात येण्यासाठी कित्येक दशके जावी लागली. हा परिणाम म्हणजेच सांस्कृतिक किंवा वैचारिक वसाहतवाद.

सांस्कृतिक किंवा वैचारिक वसाहतवाद म्हणजे काय? हे समजून घ्यायचे असेल, तर आपणास 19व्या शतकातील युरोपातील तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील विविध घडामोडींकडे, दृष्टिक्षेप टाकावा लागेल. या कालखंडातील युरोपसाठी ख्रिस्ती धर्ममताची समाजावरील पकड खिळखिळी झाली होती, पण पूर्णपणे नष्ट झाली नव्हती. विज्ञानातील नवनवीन शोध आणि औद्योगिक क्रांती यामुळे एका नव्या प्रकारच्या समाजरचनेची, नवीन नीतिनियमांची चर्चा युरोपीय विचारवंतांमध्ये सुरू झाली होती. त्यातच फ्रेंच राज्यक्रांतीसारखे राजकीय बदलसुद्धा होतच होते. राजे राजवाड्यांचा एक वर्ग आणि चर्च अधिकार्‍यांचा दुसरा वर्ग, या दोन्ही उच्चभ्रू वर्गांच्या व्यतिरिक्त जी तिसर्‍या वर्गातील सर्वसामान्य व्यक्ती या नव्या विचारांच्या केंद्रस्थानी होती आणि या नव्या केंद्राच्या दृष्टीने, व्यक्ती-समाज परस्परसंबंधांच्या नव्या व्याख्या तयार होत होत्या. राज्यसंस्थेची कार्ये, अधिकार आणि प्रत्येक व्यक्तीशी तिचा संबंध या विषयांचा नव्याने ऊहापोह होत होता आणि त्यानुसार नवनवीन राज्यव्यवस्था किंवा समाजव्यवस्था या विचारवंतांच्याद्वारे मांडल्या जात होत्या.

अन्य राष्ट्रांवर राज्य करणे, हे युरोपीय राष्ट्रांसाठी कसे योग्य आहे, किंबहुना ते त्यांचे नैतिक कर्तव्यच आहे असे सिद्धांत, या कालखंडात युरोपीय राज्यांच्या विस्तारवादाच्या समर्थनार्थ मांडले गेले. युरोपीय राष्ट्रांना प्राप्त झालेला ज्ञानाचा प्रकाश, अंधकारमय उर्वरित जगात पोहोचवणे या कार्यासाठी जगभरात वसाहतींचे राज्य स्थापन केले गेले आहे, असे प्रतिपादन या सिद्धांतांनी केले. युरोपीय संस्कृती, भाषा व राहणीमानाचा परिचय सर्वांना करून देणे आणि त्यानुसार, एतद्देशीय लोकांच्या वर्तनातील त्रुटी दूर करून, त्यांना पशुतुल्य अवस्थेतून बाहेर काढून माणसांप्रमाणे राहायला शिकवणे, हाच त्यांच्या उत्थानाचा एकमेव मार्ग आहे अशा प्रकारचे समज स्वतः युरोपीय समाजाने स्वतःबद्दल करून घेतलेच आणि राजकीय वर्चस्वाचा वापर करून जित राष्ट्रांमध्येही पसरवले. किंबहुना युरोप व्यतिरिक्त अन्यत्र जगात उदयास आलेल्या संस्कृती या, अखिल मानव समाजास उपयुक्त असे काही योगदान देऊ शकतात, असे या तथाकथित युरोपीय विचारवंतांच्या मनासही कधी शिवले नव्हते. अशा प्रकारचे परचक्राचे सैद्धांतिक समर्थन, याआधी कोणत्याही आक्रमकाने केले नव्हते.

युरोपातील याच काळात झालेली विज्ञानाची प्रगती, जगाचे डोळे दिपवणारी होती. आर्थिक संपन्नता, सामरिक विजय आणि वैज्ञानिक शोधांबरोबर आलेली गतिमानता, यामुळे जे जे उत्तम ते ते सर्व पाश्चात्य असा समज सर्वत्र पसरायला वेळ लागला नाही. स्वाभाविकपणे जे भारतीय संस्कृतीत उदयास आले, ते सर्व त्याज्य किंवा जर युरोपीय विद्वान कशाला चांगले म्हणाले, तर ते चांगले. म्हणून अशोक श्रेष्ठ, चंद्रगुप्त नाही. युरोपीय वैज्ञानिकांच्या यशस्वितेसमोर हे विसरले गेले की, त्यामागची आवश्यक गणिती पूर्वपीठिका कित्येक शतकांच्या भारतीय गणितज्ज्ञांच्या परंपरेतून निर्माण झाली होती. अशाप्रकारे परकीय राज्यकर्त्यांचे सर्वच बाबतीतले श्रेष्ठत्व मान्य करणे, स्वतःच्या समाजाबद्दलचा हीनभाव मनात धरणे आणि होता होईतो त्या आक्रमकांच्या समाजमूल्यांना स्वीकारून, त्यांच्यासारखेच बनण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वैचारिक वसाहतवाद. कृष्णचंद्र भट्टाचार्य यांनी अशाप्रकारच्या सांस्कृतिक वसाहतवादास ‘आत्म्याची गुलामगिरी’ असे संबोधले आहे.

अशा प्रकारच्या सांस्कृतिक वर्चस्वाचा सिद्धांत जित राष्ट्रांमध्ये दृढमूल करण्याच्या कामात, सर्वात प्रभावीपणे वापरले गेलेले साधन म्हणजे शिक्षणव्यवस्था, इतिहास आणि भाषा यांचे परकीयकरण. ब्रिटिश शिक्षणाच्या प्रभावाने, ब्रिटन अथवा युरोपला आदर्श मानणारी आणि तसेच, बनण्याचा प्रयत्न करणारी पिढी घडवावी,आपल्या इतिहासातील गौरवशाली प्रसंगांचे समाजास विस्मरण व्हावे आणि भाषेच्या र्‍हासातून परंपरांचे संचित पुसले जावे हा यामागचा उद्देश होता. आपल्याच इतिहासापासून तुटलेला आणि आपलीच भाषा विसरलेला समाज, स्वाभाविकपणे आत्मभान हरवूनच बसणार.

स्वतंत्र भारतात परिस्थिती बदलण्याकडे डोळस प्रयत्न व्हावेत, ही अपेक्षा काही चुकीची नव्हती. पण, पाश्चात्य भौतिक प्रगतीने दिपलेल्या आणि साम्यवादी तत्त्वज्ञानाने भारावलेल्या तत्कालीन नेत्यांना, अशा प्रकारच्या विचारांच्या स्वराज्याची काही आवश्यकता वाटत नव्हती. त्यामुळे ब्रिटिश जाऊन 75 वर्षे लोटली, तरी ब्रिटिश व्यवस्था अनेक दशके तशाच चालू राहिल्या आहेत. पश्चिमेकडे तोंड करून रचलेल्या अभ्यासक्रमात शिकून, भारतीय विद्यार्थ्यांचे परकीयकरण सुरूच राहिले आहे. आपल्या दैनंदिन अभिव्यक्तिमध्ये इंग्रजीचा प्रभाव वाढतोच आहे. वाढत्या जागतिकीकरणात आपले भारतीयत्व नेमके कशात आहे, हे अजूनच कळेनासे झाले आहे.

या वैचारिक वसाहतवादाच्या विळख्याचा परिचय करून घेणे, हाच या लेखमालेचा उद्देश आहे. आपल्याला जाणवतसुद्धा नसलेल्या एखाद्या सीक्रेटसांता, महिषासुर पूजन किंवा व्हॅलेन्टाईन डे च्या सामाजिक पद्धतीपासून, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या कंगोर्‍यांपर्यंत या वैचारिक वसाहतवादाचे पडसाद उमटत राहतात. त्याची लक्षणे, कारणे आणि उच्चाटनाचे प्रयत्न, विविध काळातील आणि विविध देशांच्या नेत्यांनी, अभ्यासकांनी या विषयावर मांडलेली मते, अशा सर्वांचे विहंगमावलोकन या मालेत करण्याचा विचार आहे. आपल्यापुढील समस्येचे योग्य आकलन हीच समस्या सोडवण्यातील पहिली पायरी असते.

डॉ. हर्षल भडकमकर 
(लेखकाने मुंबईतील टी.आय.एफ.आर. येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’पर्यंत शिक्षण घेतले आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत आहेत. ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत टोळी सदस्य अशी जबाबदारी आहे.)
9769923973
Powered By Sangraha 9.0