मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय आणि खाजगी शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी राज्य शासनाकडून एक नियमावली जारी करण्यात आली आहे. मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
या उपक्रमात प्रत्येक गावातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ आणि प्रतिष्ठित नागरिकांना सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे वाचलंत का? - गुंडांचे राज्य चालू देणार नाही! संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिकी कराडच्या अटकेनंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा
२६ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांनी शाळेत ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत गायन, राज्यगीत गायन, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन आणि देशभक्तीपर गीत गायन करणे. तसेच शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य सेनानी, देशभक्ती, लोकशाही इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांकरिता भाषण स्पर्धा, स्वरचित किंवा इतर कवींनी लिहिलेत्या देशभक्तीपर कवितांचे वाचन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
तसेच शाळांमध्ये देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य करण्याची स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्याचे आवाहनही राज्य शासनाने केले आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करणे आणि त्यांनी तयार केलेल्या हस्तकला आणि चित्रकलांची प्रदर्शनी आयोजित करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.
हे सगळे कार्यक्रम आयोजित करत असताना विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करण्यात यावा. तसेच या सूचनांप्रमाणे शाळांमार्फत प्रत्येक वर्षीचा प्रजासत्ताक दिन साजरा होईल, यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षक निरीक्षकांनी काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.