तब्बल सात महिन्यांनंतर घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपीला बेड्या

30 Dec 2024 19:51:40
Ghatkopar Hording Accident

मुंबई : घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग ( Ghatkopar Hording Accident ) कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर तब्बल सात महिन्यांनी सहआरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेने सोमवार, दि. ३० डिसेंबर रोजी लखनऊ येथून व्यावसायिक अरशद खान याला अटक केली.

या दुर्घटनेनंतर 'इगो मीडिया' कंपनीचा संचालक भावेश भिंडे, माजी संचालक जान्हवी मराठे, देखरेखीची जबाबदारी असलेला सागर पाटील आणि आर्किटेक्ट मनोज संघू यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात ऑक्टोबर महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले. २०२१ आणि २०२२ मध्ये ईगो मीडियाने ३९ विविध व्यवहारांमध्ये १० बँक खात्यांमार्फत ४६ लाख ५० हजार पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले. ही रक्कम अरशद खानला मिळाल्याचा संशय आहे. त्याप्रकरणी गुन्हे शाखेने खानला समन्स बजावले होते. समन्स जारी होताच तो फरार झाला होता. अखेर सात महिन्यांनी त्याला उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून अटक करण्यात आली. होर्डिंगप्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबतची माहिती उजेडात येण्यास यामुळे मदत होणार आहे.

Powered By Sangraha 9.0