काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची चिंता

03 Dec 2024 12:33:11
Eknath Shinde

ठाणे : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचा आजार पूर्णपणे बरा झाला नसल्याने काळजी वाढली आहे. रविवार, दि. १ डिसेंबर रोजी सातार्‍यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी परतल्यानंतर प्रकृती ठीक असल्याचे सांगणार्‍या शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाली नसल्याचे समोर आले. यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शिंदे यांनी सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी निवासस्थानीच विश्रांती घेतल्याने त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.

प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांसह भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनीही ठाण्यात धाव घेतली. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने साहजिकच मुख्यमंत्रिपदावर भाजपचा दावा आहे. त्यानुसार काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. मात्र, आता उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री पदासाठी शिंदे आग्रही असल्याची चर्चा आहे. राज्यात भाजप महायुतीकडून सरकार स्थापनेसाठी जय्यत तयारी होत असतानाच, दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने काळजी वाढली आहे. निवडणुकीत झालेल्या धावपळीमुळे आराम करण्यासाठी शिंदे हे सातार्‍यातील दरे गावी गेले होते. तिथे त्यांची प्रकृती बिघडल्याने दोन दिवस आराम केला. दरे गावाहून रविवार, दि. १ डिसेंबर रोजी ठाण्यात परतल्यावर ‘आता माझी प्रकृती ठीक आहे’ असे त्यांनी सांगितले होते. सोमवारी ते पुन्हा पक्ष आणि महायुतीच्या बैठकांमध्ये सक्रीय होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, सोमवारीही त्यांची प्रकृती ठीक नव्हती. यामुळे त्यांनी दिवसभरातील बैठका रद्द करून ठाण्याच्या घरीच विश्रांतीसाठी धाव घेतली. शिंदे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी ठाण्यातील स्थानिक शिवसेना पदाधिकार्‍यांसह माजी मंत्री विजय शिवतारे, आ. अर्जुन खोतकर, संजय शिरसाट, मुरजी पटेल, वामन म्हात्रे, राजेश क्षीरसागर आणि भाजपचे आ. गिरीश महाजन यांनी धाव घेतल्याचे दिसून आले.

शिवतारे यांना गेटवरच अडवले

एकनाथ शिंदेंची भेट घेण्यासाठी ठाण्यात आलेल्या माजी मंत्री विजय शिवतारे यांना शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी अडवले. शिवतारे यांनी पोलिसांना माजी मंत्री असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

Powered By Sangraha 9.0