चिन्मय कृष्ण दास यांच्या वकीलावर जीवघेणा हल्ला!

03 Dec 2024 19:11:03
Lawyer

मुंबई : बांगलादेशमधील हिंदू धर्मगुरू इस्कॉनचे चिन्मय कृष्ण दास यांचा खटला लढणारे वकील ( Lawyer ) अॅड. रेमण रॉय यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात वकील रेमण रॉयगंभीर जखमी झाले असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी आपल्या सोशल मिडियावरून याबाबत प्राथमिक माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार चिन्मय कृष्ण दास यांना कायदेशीर संरक्षण देणे ही त्यांची एक चूक झाली ज्यामुळे रेमण रॉय यांच्यावर ही वेळ आली.

राधारमण दास यांच्या म्हणण्यानुसार, वकील रेमण रॉय यांच्यावर झालेला हल्ला बांग्लादेशातील इस्लामिक कट्टरवाद्यांकडून करण्यात आला. घरात घुसून त्यांनी तोडफोड करत रेमण रॉय यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. सध्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यामुळे चिन्मय कृष्ण दास यांच्या वतीने युक्तिवाद करण्यासाठी चितगाव न्यायालयात एकही वकील उपस्थित नसल्याने त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीसुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

बांगलादेशात हिंदू साधूंना वकील मिळू न देण्याचे षड्यंत्र

बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या इस्कॉनच्या साधूंसाठी खटला लढण्यासाठी वकील मिळत नसून, ज्यांनी न्यायालयात बाजू मांडण्याची तयारी दाखवली होती, त्या अ‍ॅड्. रेमण रॉय यांच्यावर हल्ला करण्यात आला. हिंदू साधूंचे अशीलपत्र घेऊ नये यासाठी बांगलादेशातील ७० हिंदू वकीलांवरही अनेक खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या असल्याचा आरोप बांगलादेश सनातन जागरण समितीने केला आहे.

Powered By Sangraha 9.0