अगरतळा : ऑल त्रिपुरा हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन (ATHROA) च्या म्हणण्यानुसार शेजारी राष्ट्र असलेल्या बांग्लादेशात झालेल्या भारतीय ध्वजाच्या अपमानामुळे यापुढे त्यांचे कर्मचारी बांगलादेशी पाहुण्यांना कोणतीही सेवा देणार नाहीत. सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे या असोसिएशनचे सरचिटणीस सैकत बंद्योपाध्याय यांनी सांगितले.
“आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत आणि सर्व धर्मांचा आदर करतो. बांग्लादेशात आपल्या राष्ट्रध्वजाची विटंबना करण्यात आली आहे आणि बांगलादेशातील कट्टरवाद्यांच्या एका वर्गाकडून अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. याआधीही अशा घटना घडत असत, पण आता मर्यादा ओलांडल्या आहेत, असे ते म्हणाले.
“बांगलादेशातील सध्याची परिस्थिती खरोखरच चिंताजनक आहे. त्रिपुरामध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या लोकांची आम्ही सेवा करतो. बांगलादेशातील अल्पसंख्याकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा आम्ही निषेध करत आहोत,” असेही ते पुढे म्हणाले.
"बांगलादेशी रुग्णांवर उपचार करणार नाही"
याआधी मल्टी स्पेशालिटी प्रायव्हेट हॉस्पिटल आयएलएस हॉस्पिटलने शेजारील देशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ बांगलादेशातील कोणत्याही रुग्णावर उपचार न करण्याची घोषणा केली होती. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम हजारिका यांनी या निर्णयाची पुष्टी करताना सांगितले की, “आमच्या रुग्णालयात बांगलादेशातील लोकांवर उपचार न करण्याच्या मागणीला आम्ही पूर्ण पाठिंबा देतो. अखौरा चेकपोस्ट आणि आयएलएस रुग्णालयातील आमचे हेल्प डेस्क आजपासून बंद करण्यात आले आहेत."
बांगलादेशी नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविल्या जाऊ नयेत या मागणीसाठी रुग्णालयात निदर्शनांवर गौतम हजारिका यांनी दिलेली ही प्रतिक्रिया होती. त्यांच्या मागणीच्या समर्थनार्थ आंदोलकांनी भारतीय ध्वजाचा अनादर आणि बांगलादेशातील हिंदूंना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल वाढत्या चिंतेचा हवाला दिला होता. आंदोलकांपैकी एकजण म्हणाला, “भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान आणि अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले पूर्णपणे असम्माननीय आहेत. कट्टरपंथी विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्रध्वजाचा अनादर कसा करावा याचे प्रशिक्षण देत आहेत.