मुंबई : महायुती सरकारच्या शपथविधीसाठी जय्यत तयारी सुरु असून महायूतीच्या नेत्यांकडून या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्यासह अनेक नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली.
येत्या ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजता महायूती सरकारचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आझाद मैदानावर आम्ही सर्वांनी पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायूती सरकारचा ऐतिहासिक शपथग्रहण सोहळा होतो आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार आणि येणाऱ्या सर्व लोकांची व्यवस्था करणे ही आमच्या तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही इथल्या व्यवस्थेची पाहणी केली आहे."
हे वाचलंत का? - नागपूरात काँग्रेसमधील वाद उफाळला! बंटी शेळकेंचे नाना पटोलेंवर गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंची सह्याद्रीवर बैठक!
"आज दुपारी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री निवासस्थानी एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीनंतर कदाचित आज संध्याकाळी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांची बैठक होईल," अशी माहिती संजय शिरसाट यांनी यावेळी दिली.