नागपूरात काँग्रेसमधील वाद उफाळला! बंटी शेळकेंचे नाना पटोलेंवर गंभीर आरोप

03 Dec 2024 12:39:56

Patole 
 
नागपूर : नागपूर मध्य विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर आपल्या पराभवाचे खापर फोडले आहे. तसेच नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यावरुन सध्या नागपूर काँग्रेसमध्ये वातावरण पेटले आहे.
 
बंटी शेळके म्हणाले की, "निवडणूकीच्या आधी नाना पटोलेंच्या माध्यमातून बराच गैरप्रकार झाला आहे. वेगवेगळ्या समाजांमध्ये माझ्याप्रति द्वेष निर्माण व्हावा यासाठी त्या समाजाच्या लोकांची नावे पॅनेलमध्ये टाकण्यात आले. बंटी शेळकेमुळे त्यांचे तिकीट कट झाले, असे त्यांना वाटत होते. राष्ट्रीय स्वसंयसेवक संघाच्या मुख्यालयातून काँग्रेसचा कार्यकर्ता निवडून आल्यास राहूल गांधींशी त्याची जवळीक वाढेल. त्यामुळे आएसएसचे एजंट नाना पटोले आणि त्यांच्या नागपूरच्या सिपेसालारांनी आपल्याच पक्षाचा घात केला आहे."
 
हे वाचलंत का? -  मालेगाव वोट जिहाद प्रकरण! नाशिक मर्चंट को. ऑप. बँकेच्या व्यवस्थापकास अटक
 
"२०१९ मध्ये मी फक्त ४००० मतांनी निवडणूकीत पराभूत झालो होतो. त्यानंतर नाना पटोलेंच्या माध्यमातून पॅनलमधून माझे नाव वगळण्यात आले. त्यामुळे त्यांनी आरएसएससोबत हातमिळवणी केल्याचे सिद्ध होते. २०१९ मध्ये काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचे काम त्यांनी केले. प्प्रियंका गांधींनी माझ्या प्रचारासाठी आल्या असताना नाना पटोले आणि त्यांचे कार्यकर्ते आले नाहीत. बोटावर मोजण्याइतके त्यांचे कार्यकर्ते होते. माझे नेते राहूल गांधी आहेत. आम्ही त्यांचे सैनिक आहोत, नाना पटोलेंचे नाही. पटोलेंच्या मनात आपल्या कार्यकर्त्यांविषयी द्वेषाची भावना आहे," असे ते म्हणाले.
 
बंटी शेळकेंच्या या गंभीर आरोपांनतर त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही ते आपल्या आरोपांवर ठाम आहेत. या वादामुळे आता नागपूर काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0