श्यामबाबूंनी ज्या काळात ते सिनेमे केले आहेत, त्या काळाच्या कसोटीवर ते सिनेमे खरे उतरले आहेत, या दृष्टीने त्यांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.
श्याम बेनेगल हे माहितीपट बनवायचे. अनेक जाहिरातीही त्यांनी तयार केल्या होत्या. त्यामुळे ‘चित्रपट’ या माध्यमाचे वेगळेपण ते सुरुवातीपासूनच जाणून होते. श्यामबाबूंना काही जण ‘समांतर चळवळीचे प्रणेते’ मानतात. पण, आपल्याकडे ‘समांतर चळवळ’ ही त्यांच्या आधीपासूनच सुरू होती. सत्यजित रे व ऋत्विक घटक या दिग्दर्शकांचे चित्रपट, मृणाल सेन यांचा १९७० साली आलेला ‘भुवन शोम’, मणी कौल यांचा ‘उसकी रोटी’ आणि कुमार साहनी यांचा ‘माया दर्पण’ यांसारखे चित्रपट ‘समांतर चळवळी’चीच उदाहरणे आहेत. पण, या ‘समांतर चळवळी’ला अधिक ठळक करण्याचे आणि लोकाभिमुख करण्याचे काम श्याम बेनेगल यांच्या सिनेमांनी केले. बेनेगलांच्या आधीचे जे ‘समांतर चळवळी’तील चित्रपट होते ते थोडेसे दुर्बोध होते. सर्वसामान्य प्रेक्षकाला ते सहज समजणारे नव्हते. त्यामुळे प्रेक्षक त्या चित्रपटांपासून दूर होते. श्यामबाबूंच्या चित्रपटांनी त्या प्रेक्षकांना जवळ आणले.
श्याम बेनेगल यांनी जेव्हा ‘अंकुर’ हा चित्रपट तयार केला, तेव्हा त्यांना तो हैदराबादमधील प्रादेशिक भाषेत करायचा होता. त्यावेळी हा चित्रपट जर अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर तो हिंदी भाषेमध्ये केला पाहिजे, असा सल्ला त्यांना त्यांच्या निर्मात्यांनी दिला. त्या सल्ल्यामुळे ‘अंकुर’ हा चित्रपट हिंदीमध्ये तयार झाला आणि त्याला चांगले यशही मिळाले. निर्मात्यांनी तो सल्ला दिला नसता, तर कदाचित श्यामबाबूंनी त्यांचे चित्रपट हैदराबादमधील त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्येच तयार केले असते. ‘अंकुर’नंतरच्या चित्रपटांमध्येही श्याम बेनेगल यांनी प्रादेशिकता आणली. पण, त्यांची भाषा हिंदीच ठेवली. १९७३-७४ सालापासून ‘समांतर चळवळी’त श्यामबाबूंचे खूप महत्त्वाचे योगदान लाभले.
श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांमधील प्रभावी दृश्यात्मकता त्यांच्या ‘अंकुर’ या सिनेमापासूनच दिसून येते. एखादे दृश्य कोणत्याही संभाषणाशिवाय आपल्याला व्यक्तिरेखेविषयी, त्या परिस्थितीविषयी आपल्याला खूप काही सांगून जाते ते प्रभावी दृश्यात्मकतेमुळेच. ‘अंकुर’ चित्रपटात अशी बरीच दृश्ये आहेत, ज्यात आपल्याला प्रभावी दृश्यात्मकता दिसते.
श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांविषयी समाजमाध्यमावर काहींनी टीका केलेली वाचली. पण, प्रत्येक गोष्टीचे त्या त्या काळानुसार मूल्यमापन व्हावे, असे माझे मत आहे. आजच्या काळातले निकष त्या काळाला लावून चालत नाही. आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो, तेव्हा सुरुवातीच्या काळात त्याच्यात काही त्रुटी असणे स्वाभाविक असते. हळूहळू मग त्यात सुधारणा होत जातात, त्या कलाकृतीत अधिक वास्तविकता येत जाते. त्यामुळे श्यामबाबूंनी ज्या काळात ते सिनेमे केले आहेत, त्या काळाच्या कसोटीवर ते सिनेमे खरे उतरले आहेत, या दृष्टीने त्यांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.
श्याम बेनेगल यांची चित्रत्रयी दृष्टी मला खूप आवडते. त्यांचे ‘अंकुर’, ‘निशांत’ आणि ‘मंथन’ हे कथानकानुसार वेगवेगळे असलेले चित्रपट, पण ते एका आशयसूत्राने बांधलेले आहेत. ‘अंकुर’ या चित्रपटात तो लहान मुलगा जमीनदाराच्या घरावर दगड मारतो, त्यातून विद्रोहाची भावना निर्माण होते. ‘निशांत’ या चित्रपटात ही भावना अधिक तीव्र झालेली आपल्याला दिसते. संपूर्ण गाव शिक्षकाची बायको पळवणार्या जमीनदाराच्या विरोधात पेटून उठलेले आपल्याला ‘निशांत’ या सिनेमात पाहायला मिळते. म्हणजे एका चित्रपटात ठिणगी पेटते आणि दुसर्या सिनेमात ती अधिक भडकते. तिसर्या म्हणजे, ‘मंथन’ या सिनेमात आपल्याला या पुढची पायरी पाहायला मिळते. या विद्रोहाचे पुढे काय? याचे उत्तर ‘मंथन’मध्ये आहे. जमावाने फक्त विद्रोह करत राहावा की, विकासाच्या वाटेवर जावे, हा प्रश्न उभा ठाकलेला असताना ‘मंथन’ चित्रपटात आपल्याला तो विकास दिसतो. ‘मंथन’मध्ये आपल्याला स्थानिक आणि जातीय राजकारण, तानेबाने असे सगळे विषय दिसतातच. पण, तुम्ही एकत्र येऊन एक सहकारी चळवळ सुरू करू शकता, हा जो विचार त्यात मांडला गेला आहे, तो महत्त्वाचा!
श्याम बेनेगल यांचा मला आवडलेला चित्रपट म्हणजे ‘भूमिका.’ स्मिता पाटील यांच्या अभिनयामुळे मला तो आवडला होता. पण, एखाद्याचा अभिनय, चित्रपटातील वेशभूषा आपल्याला आवडते, त्यामागे दिग्दर्शकाची नजर असतेच. माझी आणि श्याम बेनेगल यांची भेट झाली ती १९९८ साली. त्यावेळी त्यांचा ‘समर’ हा चित्रपट आला होता. ‘समर’ला ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाल्याच्या निमित्ताने तो ‘प्रभात चित्रमंडळा’तर्फे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखवला जाणार होता. मी त्यावेळी पत्रकारिता शिकत होता. आमच्या शिक्षिकांनी आम्हाला त्याविषयी सांगितले आणि मी तो चित्रपट पाहायला गेलो. श्याम बेनेगल यांच्यासोबतच ‘प्रभात’शी झालेली ती माझी पहिली भेट. मी त्यावेळी चित्रपट तर खूप पाहायचो. पण, चित्रपटातील कलाकारांना प्रत्यक्षात कधी भेटलो नव्हतो. श्यामबाबूंसोबत चित्रपटातील इतरही कलाकार त्यावेळी उपस्थित होते. चित्रपट दाखवला गेल्यानंतर तो कसा तयार झाला, त्यामागची प्रेरणा काय होती, अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली. सुदैवाने मीही पुढे या चित्रपट चळवळीत आलो.
श्यामबाबूंचा ‘फिल्म सोसायटी चळवळी’शी घनिष्ट संबंध होता. दिग्दर्शक म्हणून आपली जबाबदारी सांभाळत असतानाच, ‘फिल्म सोसायटी चळवळी’त ते तन्मयतेने भाग घ्यायचे. ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया’ ही सत्यजित रे स्थापित आमची जी शिखर संस्था आहे, त्याचे ते काही काळ अध्यक्ष होते. या संस्थेचा पदाधिकारी असल्यामुळे सभेच्या निमित्ताने श्यामबाबूंशी भेट व्हायची. या सभांमध्येच त्यांनी एक महत्त्वाची संकल्पना मांडली, ती म्हणजे ‘कॅम्पस क्लब.’ ‘कॅम्पस क्लब’ म्हणजे ‘फिल्म सोसायटी’ ही चळवळ तरुणांपर्यंत, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्या विद्यार्थ्यांनी चित्रपटांकडे एक आस्वादक म्हणून पाहावे, यासाठी केलेले प्रयत्न! मी सुद्धा अनेक महाविद्यालयांमध्ये जाऊन ‘कॅम्पस क्लब’ स्थापन करणे वगैरे असे प्रयत्न करत असतो. त्यामागची प्रेरणा श्यामबाबूंची आहे.
श्याम बेनेगल यांच्याशी असलेला अजून एक वेगळा संबंध म्हणजे ‘मामी (मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज फेस्टिवल.) बेनेगल ‘मामी’चे सुद्धा काही काळ अध्यक्ष होते आणि मी या संस्थेच्या निवड समितीत होतो. त्यामुळे वेळोवेळी ते आम्हा सर्व सदस्यांना सगळ्यांना भेटायचे आणि आमच्याशी चर्चा करायचे. त्यांचा त्यावेळचा आवडता चित्रपट जो होता तो म्हणजे, ‘फोर मन्थ्स, टू वीक्स, थ्री देज’ (Four months, two week, Three days.) तो एक रुमानियाचा चित्रपट आहे, जो ‘मामी फेस्टिवल’मध्ये दाखवला गेला होता. श्यामबाबूंना तो खूप आवडला होता आणि आम्ही त्याच्यावर चर्चासुद्धा केली होती.
त्यांची एक गोष्ट मला खूप आवडायची ती म्हणजे, जरी खूप मोठे दिग्दर्शक असले, तरी ‘मामी’ सारख्या संस्थांचे अध्यक्ष जरी असले, तरी मी त्यांना अनेक ‘फिल्म फेस्टिवल्स’मध्ये रांगेत उभे राहताना पाहिले आहे. ती शिस्त त्यांच्याकडे होती. फिल्म बघायला आत जाण्यासाठी लोक रांगेत उभे आहेत म्हणून ते सुद्धा त्यांच्यासोबत रांगेत उभे राहायचे. मी कुणीतरी मोठा आहे, असा अभिमान त्यांनी त्यावेळी बाळगला नाही. परेश मोकाशी यांचा ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा चित्रपट जेव्हा आला, तेव्हा त्याचे पहिले स्क्रिनिंग आम्ही ‘प्रभात चित्र मंडळ’मध्ये केले होते. त्यावेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या आणि प्रेक्षकांची बाहेर रांग लागली होती. त्या रांगेत तिसर्या क्रमांकावर श्याम बेनेगल उभे होते. दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित चित्रपट असल्यामुळे श्यामबाबू तो पाहायला आले होते. आपण आत जाऊन बसू, असा विचार न करता ते प्रेक्षकांसोबत रांगेत उभे राहिले. म्हणजे इतर दिग्दर्शकांच्या कलाकृतींकडेही ते आदराने पाहायचे. त्यांना भावपूर्ण आदरांजली...
डॉ. संतोष पाठारे
(लेखक हे दिग्दर्शक, चित्रपट अभ्यासक आणि प्रभात चित्र मंडळाचे जनरल सेक्रेटरी आहेत.)