गीत उमगले नवे...

29 Dec 2024 11:32:04
Book

सुप्रसिद्ध कलाकार डॉ. सुबोध केरकर (यांनी चित्रकार बनण्यासाठी आपली मेडिकल प्रॅक्टिस बंद केली) म्हणतात की, “तुम्हाला व्याकरण येते किंवा तुमच्याकडे लेखनकला आहे, म्हणून तुम्ही लेखक बनत नाही, तर उत्तम लेखक बनण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काहीतरी लोकांना सांगावेसे वाटले पाहिजे आणि ते वेगळे असले पाहिजे.”

व्यवसाय आणि शिक्षण आर्किटेक्ट, वास्तूकार म्हणून वेगळेपण हे की, त्यांना आवड मंदिर स्थापत्याची. पण, काही तरी व्यक्त करावेसे वाटले, मग ते कधी वास्तू संबंधित असते, तर कधी ललित. त्यातून वृत्तपत्रीय लेखन, आकाशवाणीवर सादरीकरण, कुठे निवेदन, तर कधी लहानग्यांसाठी युट्यूब चॅनेल, असे विविध प्रयोग होत गेले. शेवटी महाविद्यालयात शिकताना फिल्मी गाणी, ताल, वाद्य या गोष्टींचे रसग्रहण करण्याची कार्यशाळा घेतली गेली होती, तेव्हा जे बीज रोवले गेले होते, ते काही लेखांत व शेवटी एका पुस्तक स्वरूपात प्रगट झाले. प्रगट होताना आखीवरेखीव आकार न घेता जसे सुचले, भावले तसे उमटले. कथा, कादंबरी वाचताना, कविता अनुभवताना, चांगले चित्र बघताना गाणे आठवत गेले, उलगडत गेले, रुजत गेले.

सर्वसाधारण गाण्यांवरचे पुस्तक म्हणजे गाण्याची शास्त्रीय पार्श्वभूमी, संगीत, वाद्यांचा वापर, त्यामागची कथा या प्रकारे लिहिले जाते. प्रत्यक्षात जेव्हा एखादे गाणे आपल्या कानावर पडते, तेव्हा त्याच्यात गुंतलेली एखादी कथा, गंमत, कविता, इतर गाणी आणि आठवणीही असतात. त्याने आपण गाण्याशी जास्त जोडले जातो. लेखिका याच मार्गाने आपल्याला गाण्याशी जोडत जाते. हा गुंतवायचा वेगळाच प्रकार आहे. त्यातही वेगवेगळी कलात्मक अभिरुची सर्वत्र दिसते. उदाहरणार्थ, ‘वोह चांद खिला’ या ‘अनाडी’मधल्या गाण्याबद्दल लिहिताना प्रवास ग्रेसच्या ‘चंद्र माधवीच्या प्रदेशा’तून सुरू होतो. कविता आणि गाण्याची सांगड घातली जाते किंवा ‘अकॉर्डीयन पीस’बद्दल लिहिताना ‘ता रा रि, ता रा रि....’ या राजकपूर-सुरैय्यावर चित्रित झालेल्या गाण्यावर लिहिले जाते. ‘आज जानेकी जिद ना करो’ याचे रसग्रहण तर चक्क मुक्त छंदातून - कवितेतून केले आहे. चित्रदुर्गच्या कातळावर लिहिताना कविता व्यक्त होते. गाण्याबरोबर त्याचे संगीत, एखादा वाद्याचा सुंदर तुकडा वर्णन करता करता त्यामागचे संगीतकाराचे कौशल्य, एखादा ‘पॉज’ या गोष्टी सहजतेने सांगितल्या जातात. गाण्याचे बोल, त्यातील नटनट्यांचा अभिनय, कोरिओग्राफी या सगळ्याच आढावा घेत भाष्य केले जाते. सिनेमाच्या संपूर्ण गोष्टीत त्या गाण्याचे स्थान काय, त्याने एकूण थीमला कसा उठाव आणतात, हेही व्यक्त होते. वाचनाची आवड, चांगल्या गोष्टीची जाण आणि लेखन कौशल्य हे एकत्र असल्याने गाण्याचे वर्णन ते राजवर्खी आहे, त्याला मधाचा गोडवा आहे आणि केशराचा राजस सुगंध आहे, असे सहजपणे करू शकतात.

साधारण १९५० ते २०१६ पर्यंतची ३६ गाणी घेतली आहेत. जुनी, नवी मिसळलेली आहेत. हिंदी बरोबर मराठी गाणीही घेतली आहेत. शंकर रमणींची, सुधीर मोघेंची आगळी गीते निवडली आहेत. या सर्व गीतांचा अनुक्रम लावताना किंवा लिहितानाही काही मध्यवर्ती कल्पना किंवा थीम आहे, असं जाणवत नाही. वेगवेगळ्या काळात, गीतकारांत आणि गाण्यांत आपण मुक्तपणे विहरत असतो. पुस्तकाचे हेच वैशिष्ट्य आहे. इतर पुस्तकांतून जी शास्त्रीय संगीताशी जवळीक साधत गाणे समजावले जाते किंवा त्याचा आस्वाद घेतला जातो, तो इथे टाळला आहे. गाणे मनाला जसे भावले तसे व्यक्त झाले आहे. सलग एका बैठकीत वाचण्याचे हे पुस्तक नाही, वाचत, गाणी आठवत, गुणगुणत, ऐकत वाचण्याचे ही पुस्तक आहे. क्यूआर कोड प्रत्येक लेखाच्या शेवटी दिला आहे. त्यामुळे माहिती नसलेल्या गाण्यांचा आस्वादही घेतला जातो. काही वेळा शब्दांचा फुलोरा अति होतो, लालित्यातच गुंतला जातो. थोडा संपादकाचा हात फिरायला हवा होता, असे वाटते.

‘पुस्तकप्रेमी’ या फेसबुकवरील ग्रुपच्या माध्यमातून लेखिका श्रेया राजवाडे आणि प्रकाशक भाग्यश्री प्रकाशन परिचयात आले, त्यातून या पुस्तकाचा जन्म झाला. साधारण १९० पानी पुस्तक ३२५ रुपयांना उपलब्ध आहे.

नुकतेच अशोक राणे यांचे ‘सिनेमा पाहणारा माणूस’ वाचले, पाठोपाठ श्रेया राजवाडे यांचे ‘गीत उमगले नवे’ हे गीतांवरचे पुस्तक हाती पडले. सिनेमाची समीक्षा शिकत असतानाचे अनुभव वाचतानाच गीत समीक्षेचाही परिचय झाला. कधी कधी चांगले योग आपोआप जुळून येतात, ते असे.

पुस्तकाचे नाव : गीत उमगले नवे
लेखिका : श्रेया राजवाडे
प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन
पृष्ठसंख्या : १९०
मूल्य : ३२५ रु.
Powered By Sangraha 9.0