राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वाहिली आदरांजली

28 Dec 2024 12:24:43
Draupadi Murmu

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवार, दि. २७ डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ( Manmohan singh ) यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी श्रद्धांजली वाहिली. भेटीदरम्यान राष्ट्रपतींनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धीर दिला.

राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जी अशा दुर्मीळ राजकारण्यांपैकी एक होते, ज्यांचा शैक्षणिक आणि प्रशासकीय जगतातही तितक्याच सहजतेने वावर होता. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या विविध भूमिकांद्वारे त्यांनी आर्थिक सुधारणांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. देशसेवेसाठी, त्यांच्या निष्कलंक राजकीय जीवनासाठी आणि अत्यंत नम्रतेसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांचे जाणे आपल्या सर्वांचे मोठे नुकसान आहे. भारताच्या अशा महान सुपुत्रास आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करत आहोत,” असे राष्ट्रपतींनी नमूद केले. उपराष्ट्रपती उपाध्यक्ष जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी सुदेश धनखड यांनीही माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा, काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खा. प्रियांका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह केंद्रीय मंत्री, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, खासदार, विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांनीदेखील माजी पंतप्रधानांना आदरांजली वाहिली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव शुक्रवारी त्यांचे निवासस्थान ३, मोतीलाल नेहरू रोड, नवी दिल्ली येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांचे पार्थिव आज शनिवार, दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता काँग्रेस मुख्यालयात नेण्यात येणार असून काँग्रेस कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनता सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. यानंतर येथून त्यांची अंतिम यात्रा काढण्यात येणार आहे.

Powered By Sangraha 9.0