डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार

27 Dec 2024 14:20:34

MANMOHAN SINGH
 
नवी दिल्ली : ( Dr. Manmohan Singh Death) माजी पंतप्रधान आणि आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवार, दि. २८ डिसेंबर रोजी पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. सध्या त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.
 
काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली माहिती 
 
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल म्हणाले की, “देश आणि काँग्रेससाठी हा अत्यंत दुःखद दिवस आहे. ते या देशाच्या प्रशासकांपैकी एक होते. आम्ही आमचा महान नेता गमावला आहे. १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सुशासनाचे प्रदर्शन करणाऱ्या एका नेत्याला गमावणे, हे देशाचे मोठे नुकसान आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत आम्ही अधिकृतपणे घोषणा करू.” असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
 
२१ तोफांची सलामी
 
देशाच्या माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी शासकीय प्रोटोकॉलचे पालन केले जाते. देशाप्रती त्यांनी दिलेल्या योगदानाचा आणि त्यांच्या पदाचा सन्मान करणे हा त्याचा उद्देश आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी माजी पंतप्रधानांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळले जाते. अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाते. माजी पंतप्रधानांच्या शेवटच्या दौऱ्यात सुरक्षा आणि प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाते. याशिवाय लष्करी बँड आणि सशस्त्र दलाचे जवानही शेवटच्या यात्रेत सामील होऊन पारंपारिक संचलनही करतात.
 
 
 
Powered By Sangraha 9.0