नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडी आघाडी मधील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. आम आदमी पक्षाने २६ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेत काँग्रेसनेते अजय मकेन यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न केल्यास काँग्रेस पक्षाला इंडी आघाडीतून काढून टाकण्याचा प्रस्ताव इंडी आघाडीच्या घटक पक्षांकडे करण्यात येईल असे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह पत्रकारांशी बोलताना म्हणाले की काँग्रेस जाणीवपूर्वक भाजपला मदत होईल अशा पद्धतीचे वर्तन करत आहे. अजय मकेन हे जाणीवपूर्वक आम आदमी पक्षाच्या नेत्यांना बदनाम करीत आहेत. अरविंद केजरीवाल यांना ते देशविरोधी म्हटले. अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसच्या नेत्यांसाठी लोकसभेच्या वेळी दिल्लीमध्ये प्रचार केला होता. केजरीवाल यांनी चंदिगडमध्ये सुद्धा प्रचार केला होता. वेगवेगळ्या विषयांवर आम आदमी पक्ष काँग्रेस सोबत संसदेत लढत असतो, आणि आज त्यांनाच देशविरोधी ठरवले जात आहे. दिल्ली काँग्रेसने २५ डिसेंबर रोजी आम आदमी पक्षाच्या विरोधात व्हाईट पेपर प्रकाशीत केला. यामध्ये दिल्लीमध्ये प्रदूषण, सांडपाण्याची समस्या यावरून त्यांनी आम आदमी पक्षाला चांगलेच धारेवर धरले आहे.
केजरीवाल नव्हे, फर्जीवाल!
काँग्रेसचे नेते अजय मकेन यांनी आम आदमी पक्षावर टीका करताना म्हटले की " आम आदमी पक्ष भ्रष्टाचार मुक्त आंदोलनावर स्वार होऊन सत्तेत आला, परंतु त्यांना दिल्लीमध्ये जनलोकपाल स्थापन करता आले नाही. दिल्ली मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना, एकच शब्द बोलावासं वाटतो आणि तो म्हणजे फर्जीवाल. या देशात घोटाळा करणाऱ्यांचा राजा एकच आहे आणि तो म्हणजे अरविंद केजरीवाल आणि म्हणूनच आम्ही आम आदमी पक्षाच्या विरोधात हा व्हाईट पेपर काढत आहोत." आम आदमी पक्ष आणि काँग्रेस दोन्ही इंडी आघाडीतील घटक पक्ष आहेत, परंतु दोन्ही पक्षांमधले मतभेद सातत्याने चव्हाट्यावर आले आहेत. दिल्ली आणि पंजाबच्या निवडणुकांमध्ये हे पक्ष वेळोवेळी एकमेकांसमोर उभे ठाखले आहेत.