एसटी स्थानकांचा कायापालट करणार!

26 Dec 2024 15:48:01
 
Pratap Sarnaik
 
रायगड : हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान पुन्हा सुरू करून बसस्थानकांचा कायापालट करणार, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. गुरुवार २६ डिसेंबर रोजी त्यांनी पनवेल आणि खोपोली बसस्थानकाला भेट दिली.
 
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "स्वच्छता हा कोणत्याही व्यवसायाचा मूलभूत पाया असतो. त्यामुळे प्रवासी सेवेत प्रवाशांना स्वच्छ, सुंदर बसस्थानक, बस स्थानकाचा परिसर आणि तेथील प्रसाधनगृहे या सगळ्यांना भविष्यात प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवून राज्यभरातील सर्व बसस्थानकांचा कायापालट करणे हा आमचा उद्देश आहे. तसेच प्रत्येक आगारात चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांसाठी असलेली विश्रांतीगृहेसुद्धा स्वच्छ आणि निटनेटकी असावी, यासाठीदेखील आम्ही प्रयत्न करणार आहोत," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नये : मंत्री धनंजय मुंडे
 
यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकावरील प्रसाधनगृहाला भेट देऊन तिथल्या अस्वच्छतेबाबत प्रशासनाला खडेबोल सुनावले. या भेटीदरम्यान, मंत्री सरनाईक यांनी सर्वसामान्य प्रवाशांसोबत पनवेल ते खोपोली मार्गावर एसटीच्या लालपरीतून प्रवास केला. यावेळी त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. दरम्यान, सर्वसामान्य प्रवाशांनी बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी केली. यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी लवकरच एसटीच्या ताफ्यामध्ये नव्या बसेस उपलब्ध होणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले. तसेच या बसेस आल्यानंतर पनवेल- खोपोली, पनवेल -अलिबाग आणि पनवेल- कल्याण या मार्गावर नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यासोबतच परिवहन विभाग व अन्य विभागांनी बस स्थानकाच्या परिसरात अडगळीत टाकलेली स्क्रॅप वाहने तातडीने इतर ठिकाणी उचलून न्यावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0