नागपूर : अकेला देवेंद्र क्या करेगा? असं सुप्रियाताई एकदा म्हणाल्या होत्या. पण त्यावेळी देवेंद्र अकेला नसून संपूर्ण भारतीय जनता पक्ष त्याच्यासोबत आहे, हे ताईंना माहिती नव्हते, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. बुधवार, २५ डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजित भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी यांच्या जन्मशताब्दी समारंभात ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "लोकसभेच्या निवडणूकीनंतर पुन्हा एकदा आपण सगळे कामाला लागलो आणि हा महाविजय प्राप्त केला. आज हा सत्कार जरी मंचावरील लोकांचा असला तरी तो सत्कार तुमच्या सर्वांच्या वतीने आम्ही स्वीकारतो आहोत. भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही हा सत्कार स्वीकारतोय. कारण कार्यकर्त्यांचे प्रतिक म्हणून आम्ही बसलो आहोत. एकदा सुप्रिया ताई म्हणाल्या होत्या की, अकेला देवेंद्र क्या करेगा? सुप्रियाताईंचे म्हणणे खरे होते. अकेले देवेंद्र की कोई औकात नही है, अकेला देवेंद्र कुछ नही कर सकता. पण त्यावेळी ताईंना हे माहित नव्हते की, देवेंद्र अकेला नसून पुर्ण भारतीय जनता पक्ष त्याच्यासोबत आहे."
"भारतीय जनता पार्टी तसेच मोदीसाहेब आणि गडकरी साहेबांसारखे नेते ज्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यांच्या शक्तीचे आकलन कधीच त्यांना येऊ शकत नाही. त्यामुळे आज मिळालेला विजय हा त्या शक्तीचा आहे. ही शक्ती संघटितपणे आपल्या पाठीशी उभी होती," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.