'रालोआ'च्या नेत्यांची खलबतं

25 Dec 2024 19:36:57

JAGAT PRAKASH NADDA
 
नवी दिल्ली : (NDA) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी बुधवारी दुपारी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) घटकपक्षांची बैठक पार पडली.
 
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधून भाजपने रालोआतील घटकपक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, जनता दल युनायटेडचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ ललन सिंह, अपना दल (एस) अध्यक्षा आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल उपस्थित होते. त्याचप्रमाणे जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि केंद्रीय मंत्री एचडी कुमार, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (एस) नेते जीतन राम मांझी, राष्ट्रीय लोक मोर्चाचे (आरएलएम) अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाह, भारत धर्मजन सेनेचे प्रमुख तुषार वेलापल्ली, शिवसेनेचे प्रतापराव जाधव हेही या बैठकीत उपस्थित होते.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि नड्डा यांनी काँग्रेस पक्षाने उपस्थित केलेल्या संविधानाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी काँग्रेसने संविधानाच्या मूल्यांचे कसे उल्लंघन केले हे सांगण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्दय़ांमध्ये अडकू नये आणि सरकारची धोरणे यशस्वीपणे राबविण्यावर भर द्यावा, असे शाह यांनी नमूद केल्याचे समजते.
 
रालोआ पक्षांमध्ये उत्तम समन्वयावर चर्चा झाली. यादरम्यान एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री विविध खासदारांशी समन्वय साधून त्यांचे प्रश्न कसे सोडवतील यावरही चर्चा झाली. त्याचप्रमाणे एकत्रित निवडणुका, वक्फ सुधारणा आणि आगामी विधानसभा निवडणुकांमधील समन्वय, यावरही चर्चा झाल्याचे समजते.
 
 
Powered By Sangraha 9.0