वंदनीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण

25 Dec 2024 19:01:13

balasaheb thackeray


मुंबई, दि. २५: प्रतिनिधी 
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. पहिल्या टप्प्यात महापौर निवासस्थान इमारतीचे नूतनीकरण आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यात आले आहे. इमारतीचे अंतर्गत व बाह्य भागातील स्थापत्य आणि विद्युत कामे पूर्ण करून, इमारतीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील कामासाठी मे.टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड याना कंत्राट देण्यात आले होते. तसेच मे. आभा नरेन लांबा असोसिएट्स यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या टप्प्यात महापौर निवासस्थान इमारतीच्या सांस्कृतिक ठेव्याचे जतन करून त्याचे संग्रहालयात रुपांतरीत करण्यात आले आहे. याशिवाय, प्रवेशव्दार इमारत, प्रशासकीय इमारत आणि इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकामही पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पाच्या टप्पा-१च्या कामाची एकूण किंमत १८०.९९ कोटी इतकी आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंर्तगत एक इंटरप्रिटेशन सेंटर बांधण्यात आले आहे, ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे १५३०.४४ चौ.मी. आहे. हे सेंटर भूमिगत स्वरूपात असून, तळघरात कलाकार दालन, संग्राहालय, ग्रंथालय या दालनांचा तसेच प्रसाधनगृह आणि देखभाल कक्ष यांचा समावेश आहे. प्रवेशव्दार इमारतीचे क्षेत्रफळ अंदाजे ३०९९.८४ चौ.मी. आहे, ज्यात बहुउद्देशीय सभागृह, सुरक्षा नियंत्रण कक्ष, भूमिगत वाहनतळ (२७ वाहने) आणि वाहनांसाठी दोन स्वतंत्र उद्वाहकांचा समावेश आहे. तसेच, प्रशासकीय इमारत ६३९.७० चौ.मी. क्षेत्रफळाची असून, यामध्ये उपहारगृह, कलाकार दालन कक्ष, प्रसाधनगृह आणि न्यासाचे अध्यक्ष व सचिव कार्यालये यांचा समावेश आहे. इमारतीचे छत आधुनिक मंगलौरी कौल पद्धतीने बांधण्यात आले आहे.

बाह्य विकासाची कामे

महापौर निवासस्थान आणि इतर संबंधित इमारतींव्यतिरिक्त, ३ एकर जागेत बगीचा तयार करून परिसराचे सुशोभिकरण करण्याचे कामे करण्यात आली असून, या कार्यामुळे संपूर्ण परिसर सुंदर आणि आकर्षक झाला आहे.
दुसऱ्या टप्प्यातील कामे

भविष्यकाळातील तंत्रज्ञानाचा वापर करुन, महापौर निवासस्थान इमारतीत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटाचे प्रदर्शन करणारी विविध छायाचित्रे, दृष्यचित्रे, आणि त्यांचा राजकीय प्रवास दर्शवणारी माहिती प्रदर्शित केली जाईल. अंतर्गत प्राधिकरणाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत तंत्रज्ञानाशी संबंधित विविध सेवांचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये हार्डवेअर आणि सहाय्यभूत सेवा, लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्युअल रियालिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक यांचा समावेश असेल. या कामासाठी मे. आभा नरेन लांबा असोसिएट्स या सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली असून, दुसऱ्या टप्प्यातील कामाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कंत्राटदाराची नेमणूकची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
Powered By Sangraha 9.0