काबुल : पाकिस्तानने अफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला केला. पाकिस्तानने पाक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात हा हवाई हल्ला केला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हवाई हल्ल्यामध्ये महिला आणि लहान मुलांसह १५ जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना २४ डिसेंबर २०२४ रोजी घडली असून यामध्ये एकूण सात गावांना लक्ष्य करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या एका माहितीनुसार, हवाई हल्ल्यात मृतांच्या आकड्यात वाढ होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. मीडिया रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानातील या हवाई हल्ल्याप्रकरणी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पाकिस्तानी लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानच्या काही भागांत हवाई हल्ले केले असून या हल्ल्यात विध्वंस झाला. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर या भागात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
तालिबानच्या संरणक्ष मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने चोख प्रत्युत्तर देणार असल्याची धमकी दिली आहे. अफगाणिस्तानला आपली जमिनीचे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे तालिबानने एक निवेदन केले. पाकिस्तानातील लढाऊ विमानांनी बॉम्बफेक केलेल्या भागात वझिरीस्तानच्या निर्वासितांचाही यामध्ये समावेश होता, असेही तालिबान संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
याप्रकरणी हल्ला झालेल्या भागात बचाव कार्य सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. काहींची प्रकृती परिपूर्ण गंभीर असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत मृतांच्या आकड्यामध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे.