प्रेम, शौर्य, मान अन् अपमानाची कथा; सुबोध भावेच्या 'संगीत मानापमान'चा ट्रेलर प्रदर्शित

24 Dec 2024 16:38:07

subodh bhave 
 
 
 
मुंबई : नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.
 
शौर्याला, धैर्याला, पराक्रमाला आणि त्यागाला वंदन करून एका संगीतमय प्रेमकथेचा हा संपूर्ण प्रवास चित्रपटात आपण अनुभवायला मिळणार आहे. शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची कथा त्यात दिग्गज कलाकारांची तगडी टीम असा अनोखा संगम अनुभवायाची उत्सुकता ट्रेलर पाहून नक्कीच वाढते. खाडीलकरांच्या मूळ संगीत मानापमान कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं त्यामुळे 'संगीत मानापमान' ट्रेलरला त्या चाहत्या वर्गाकडूनही लक्षवेधी प्रतिसाद मिळत आहे.
 
विविधांगी विषयांचा सुंदर मिलाप आणि कलाकारांचा रंगतदार सोहळा यावेळी या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच ‘भामिनी’ चं पात्र अभिनेत्री वैदेहीने चित्रपटात सुरेखपणे साकारलं आहे. तसेच कुटील, चाणाक्ष, धूर्त भावी सेनापती चंद्रविलास म्हणजेच सुमित राघवन यांनी देखील आपली भूमिका चोख पार पाडली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे या चित्रपटात धैर्यधर ही भूमिका साकारणार आहे. 'संगीत मानापमान' साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी संगीतबद्ध केली आहेत. तर या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायलं आहे. सुबोध भावे यांचा ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0