काश्मीरी पंडितांना धमकावणाऱ्या ‘काश्मीर फाईट’च्या मुसक्या आवळल्या, राज्य तपास यंत्रणेची कारवाई

24 Dec 2024 18:44:39
SIA

नवी दिल्ली : जम्मू – कश्मीरमधील राज्य तपास यंत्रणेने (एसआयए) ( SIA ) ‘काश्मीर फाईट’ नावाच्या कुप्रसिद्ध सोशल मीडिया हँडलमागील प्रमुख कार्यकर्त्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

प्रतिबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटद्वारे (टीआरएफ) चालवल्या जाणाऱ्या या हँडलचा वापर स्थलांतरित काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांना भीती आणि अशांतता पसरवण्याच्या उद्देशाने ऑनलाइन धमक्या देण्यासाठी केला गेला होता.

एसआयने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये दहशतवादी संघटनांच्या सोशल मीडिया हँडलवरून सोशल मीडियावर अनेक धमकीच्या पोस्ट प्रकाशित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर एसआयए जम्मूने तपास सुरू केला. तपासादरम्यान, एसआयएने श्रीनगरचा रहिवासी फरहान मुझफ्फर मट्टू याला लक्ष्यित कर्मचाऱ्यांची संवेदनशील माहिती गोळा करण्यात आणि शेअर करण्याच्या कथित भूमिकेसाठी अटक केली आहे. तपासात असे दिसून आले की मट्टूने मध्यस्थ म्हणून काम केले, एनक्रिप्टेड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मचा वापर करून स्थलांतरित कामगारांबद्दलचा गंभीर डेटा पाकिस्तानमधील हँडलर्सना पाठवला. ज्यांनी नंतर "काश्मीर फाईट" प्लॅटफॉर्मद्वारे धमक्या दिल्या होत्या.

आरोपपत्रात श्रीनगरचा रहिवासी शेख सज्जाद अहमद उर्फ सज्जाद गुलचे नाव देखील आहे, जो आता पाकिस्तानातून सक्रिय आहे आणि या कटाचा मास्टरमाईंड आहे. सज्जादवर स्थलांतरित कामगारांना धमकावण्याच्या आणि केंद्रशासित प्रदेशातील जातीय सलोखा बिघडवण्याच्या मोहिमेचे समन्वय साधल्याचा आरोप आहे. जम्मूच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांसमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0