"तुमचाही संतोष देशमुख..."; शिवसेना आमदाराच्या पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी

    24-Dec-2024
Total Views |

tanaji sawant
 
धाराशिव : (Tanaji Sawant) राज्यात बीड हत्याकांड प्रकरणामुळे राजकारण तापलेलं असतानाच शिवसेना आमदाराच्या दोन पुतण्यांना जीवे मारण्याची धमकी मिळालेल्याची बातमी समोर आली आहे. माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आणि केशव सावंत या दोघांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. "तुमचाही संतोष देशमुख केला जाईल", अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. या पूर्वी धनंजय सावंत यांच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती.
 
"तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग करु"
 
"तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग करु", या अज्ञातांकडून शंभरच्या नोटेसह धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. धनंजय सावंत आणि केशव सावंत यांच्याकडून ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी धनंजय सावंत यांच्या घरावर गोळीबार झाला होता. धनंजय सावंत हे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच सोनारी येथे त्यांचा भैरवनाथ साखर कारखाना आहे. केशव सावंत हे तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. तेरणा साखर कारखान्याकडे जाणारा ट्रक अडवत दुचाकी वरुन आलेल्या दोन अज्ञातांनी ट्रक चालकाला बंद पाकीट दिले. टपाल असल्याचे सांगत बंद पाकीट तेरणा कारखान्यावर सुरक्षा रक्षकाकडे देण्यास सांगितले. बंद पाकीटामध्ये १०० रुपयांच्या नोटीसोबत जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र होते. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.