ठाणे : कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्यावतीने (दि.३० मार्च) गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा २५ वे वर्षे आहे. त्यामुळे यंदाची हि हिंदू नववर्ष ( hindu new year ) स्वागतयात्रा अनोख्या पद्धतीने करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. यंदाच्या स्वागत यात्रेत तरुणाईचा सहभाग वाढावा म्हणुन आयोजकांनी युवा दिनाचे औचित्य साधून १२ जाने. रोजी शहरात युवा दौड आयोजित केली आहे. यासाठी शहरातील विविध संस्थांना जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नववर्ष स्वागत यात्रेची सर्व संस्था प्रतिनिधींची दुसरी बैठक नुकतीच कौपीनेश्वर मंदिर ज्ञानकेंद्रामध्ये संपन्न झाली. यामध्ये सांस्कृतिक न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, सचिव डॉ.अश्विनी बापट, निमंत्रक तनय दांडेकर, कार्यकारीणी सदस्य रविंद्र कराडकर यांच्यासह विश्वस्त मंडळी आणि विविध २० संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यंदा संविधान या विषयावर चित्ररथ साकारण्याचे आवाहन पहिल्या बैठकीत आयोजकांनी संस्थांना केले होते. स्वागत यात्रा संदर्भात सोमवारी पार पडलेल्या दुसऱ्या बैठकीत यंदाच्या स्वागत यात्रेत तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी युवा दौड आयोजित केली जाणार आहे. १२ जानेवारीला युवा दिना निमित्त विवेकानंद युवा दौड काढली जाणार आहे. या युवा दौडमध्ये जास्तीजास्त तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी शहरातील सहभागी संस्थांना आवाहन करण्यात आले आहे. तसेच शहरातील महाविद्यालयांमध्येही व्याख्यानाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. "भारत २०४७ ' या विषयावर डॉ.उदय निरगुडकर, प्राध्यापक मिलिंद मराठे, तसेच करंजीकर व विजय जोशी यांची व्याख्याने होणार आहेत. यंदा गुढीपाडवा मार्च महिन्याच्या अखेरीस असला तरी, स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष म्हणून तीन महिने आधीपासून कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यामध्ये सांस्कृतीक, सामाजिक, सांगितीक आणि प्रबोधनात्मक असे विविध प्रकारच कार्यक्रम असणार आहेत.
संविधान विषयावर चित्ररथ
यंदाच्या स्वागत यात्रेत भारतीय संविधानाची भलीमोठी प्रतिकृती उभारण्याचा मानस असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. तर,संविधान या विषयावर चित्ररथ साकारण्याचे आवाहन श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या सचिव डॅा. अश्विनी बापट यांनी संस्थांना केले आहे.