मंत्र अन् गीतांनी गुंजणार अयोध्यानगरी

23 Dec 2024 11:09:04
Ram Mandir

नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरात ( Ram Mandir ) प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. ११ जानेवारी रोजीपासून सुरू होईल आणि सोमवार, दि. १३ जानेवारी रोजीपर्यंत चालणार आहे. कार्यक्रमाचे स्वरुप प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासारखेच राहील, ज्यामध्ये विशेष अतिथी, देशभरातील महान संत, मान्यवर व्यक्ती आणि मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे.

‘श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, “गेल्या वर्षी कार्यक्रमाला येऊ न शकलेल्या संत आणि गृहस्थांची यादी आम्ही तयार केली आहे. यावेळी त्यांना आमंत्रित केले जाईल. यज्ञशाळेत फक्त निमंत्रितांनाच परवानगी असणार आहे.”

या काळात अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिरासह पाच ठिकाणी विशेष कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये यज्ञशाळा, श्रीराम मंदिर परिसर, प्रवासी सुविधा केंद्र, अंगद टिळा आणि इतर ठिकाणांचा समावेश आहे. हा कार्यक्रम धार्मिक आणि सांस्कृतिक मेळाव्यासोबतच भक्ती आणि आनंदाचा अनोखा प्रसंग असेल. अयोध्या पुन्हा एकदा रामभक्तांच्या श्रद्धेने आणि आनंदाने गुंजणार आहे.

आमंत्रणे आणि मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती

‘श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ने सांगितले की, “यावेळी त्या संत आणि प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित केले जाईल, जे गेल्या वर्षी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. ५० प्रतिष्ठित कुटुंबांनाही विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ‘विश्व हिंदू परिषद’ आणि इतर मोठ्या संघटनांचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत.

मुख्य कार्यक्रम आणि नियम

यज्ञशाळा आणि मंदिर परिसर: या ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांना फक्त आमंत्रित पाहुणेच उपस्थित राहू शकतील.

विधी आणि जप : शुक्ल यजुर्वेदातील १ हजार, ९७५ मंत्रांसह अग्निदेवतेला नैवेद्य दाखवला जाईल. ११ वैदिक शिक्षक तीन दिवस हा विधी पूर्ण करतील.

रामललाची अभिवादन गीते आणि प्रवचन: दररोज सकाळी ९.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतील.

सांस्कृतिक कार्यक्रम : अंगद टिळा येथे दुपारी आणि संध्याकाळी राम कथा, प्रवचन आणि सांस्कृतिक सादरीकरण होईल.

Powered By Sangraha 9.0