नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी सोमवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त ७१,००० हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. यावेळी महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
सरकारने प्रत्येक नागरिकाला विमा संरक्षण देण्यासाठी विमा सखी योजना सुरू केली, ज्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. ड्रोन दीदी, लखपती दीदी आणि बँक सखी योजना यासारख्या उपक्रमांमुळे कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातही रोजगार निर्माण होत आहेत, असे ते म्हणाले. महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. २६ आठवड्यांची प्रसूती रजा मिळण्याचा नियम लागू केल्याने लाखो महिलांच्या करिअरचे रक्षण झाले आहे. सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळाले आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिला आता तारणमुक्त कर्ज मिळवू शकतात. प्रधानमंत्री आवास योजनेने हे सुनिश्चित केले आहे की वाटप करण्यात आलेली बहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत. नारी शक्ती वंदन अधिनियमाने महिलांना विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण सुनिश्चित केले आहे. त्यामुळे महिलांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होईल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
रोजगार मेळ्यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून भारताच्या युवा वर्गाच्या गुणवत्तेचा पुरेपूर वापर करण्याला सरकार प्राधान्य देत असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. गेल्या १० वर्षात विविध मंत्रालये आणि विभागात सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय ठामपणे प्रयत्न केले जात आहेत. आज ७१,००० पेक्षा जास्त युवांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.गेल्या दीड वर्षात सुमारे १० लाख स्थायी सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या असून यामुळे एक उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित झाला आहे. या नोकऱ्या संपूर्ण पारदर्शकता राखून दिल्या जात आहेत आणि नवे नियुक्त कर्मचारी समर्पित वृत्ती आणि एकात्मतेने देशाची सेवा करत आहेत,असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.