दिसपूर : बालविवाहासारख्या क्रुर प्रथेविरोधात आसाम सरकारने कठोर पाऊलं उचलण्याचा निर्णय घेतला आणि याचा सकारत्माक परिणाम आता दिसू लागला आहे. गेल्या २ वर्षात आसाम पोलिसांनी ५३४८ जणांना ताब्यात घेतले आहे. त्याच बरोबर ५८४२ गुन्हे नोंदवले आहेत. आसाम पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२३ मध्ये बालविवाहाच्या विरोधातील मोहीम पोलिसांनी हाती घेतली होती. आसाम पोलिसांनी पहिल्या फेरीत एकूण ३४२५ जणांना ताब्यात घेतले होते. दुसऱ्या फेरीमध्ये ९१३ जणांना अटक केली होती.
आसाम पोलीसचे एडीजीपी एमपी गुप्ता माध्यमांशी बोलताना म्हणाले की बालविवाहाची अनिष्ठ प्रथा २०२५ पर्यंत संपुष्टात आली पाहिजे हे आमचे ध्येय आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार २१ डिसेंबर २०२४ पासून विशेष तिसरी फेरी सुरू करण्यात आली. या अटकसत्राच्या तिसऱ्या फेरीत एकूण ३४५ खटले दाखल केले असून एकूण ४३१ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये आरोपी पती, कुटुंबातील सदस्य आणि लग्नाचे विधी करणारे काझी यांचा सुद्धा समावेश आहे. आसाम पोलिसांच्या माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यातील मोहिमेमध्ये धुबरी जिल्ह्यात ६८,बारपेटा जिल्ह्यात ५२, दक्षिण सलमारा मानकाचर जिल्ह्यात ४२, कामरूप आणि करीमगंज जिल्ह्यात प्रत्येकी २२, दारंग आणि हैलाकांडी जिल्ह्यात प्रत्येकी २१, जणांना पोलिसांनी अटक केली.