मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. दरम्यान, त्यांनी सोमवारी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "मी आणि समीर भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत सामाजिक, राजकीय, काय घडलं आणि काय सुरु आहे यासंदर्भात सगळ्या विषयांवर चर्चा झाली. वर्तमानपत्रातून आणि माध्यमांद्वारे मी बऱ्याचशा गोष्टी ऐकल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महायुतीला मिळालेल्या महाविजयाच्या मागे ओबीसींचे मोठे पाठबळ लाभले. महायुतीच्या विजयात ओबीसींचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितले," असे भुजबळांनी सांगितले.
तसेच मला ८-१० दिवस द्या. आठ दहा दिवसांनी आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे यातून एक चांगला मार्ग शोधून काढू. तसेच मी साधकबाधक विचार करत आहे असा निरोप ओबीसींना द्या, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे छगन भुजबळ म्हणाले.