मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना राज्य मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने ओबीसी नेते नाराज आहेत. त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. रविवार, २२ डिसेंबर रोजी ओबीसी आंदोलक प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली.
या बैठकीनंतर प्रकाश शेंडगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी या बैठकीत आम्ही केली आहे. भुजबळ साहेब मंत्री असताना ओबीसींची ढाल बनून उभे असायचे. पण आता ते मंत्रीमंडळात नसल्याने ओबीसींच्या हक्काचे संरक्षण कोण करणार हा प्रश्न आमच्यापुढे आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात घ्यावे अशी आमची मागणी आहे. त्यांना मंत्रीमंडळात न घेतल्यास आमचा संघर्ष सुरुच राहील. आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे," असा इशारा त्यांनी दिला.
हे वाचलंत का? - मंत्री संजय शिरसाट आणि उदय सामंत बीड-परभणी दौऱ्यावर!
"महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मंत्रिमंडळात मराठ्यांपेक्षा ओबीसींचे मंत्री जास्त आहेत. त्यामुळे हे सरकार ओबीसींचे सरकार असल्याचे म्हणायला हरकत नाही. परंतू, हा सारा गाव आमचा मामाचा आहे, पण त्यातला एक तरी कामाचा पाहिजे. जो कामाचा आहे त्याला बाहेर काढले आणि बिनकामाचे असलेल्यांना मंत्रीमंडळात घेण्यात आले," अशी टीकाही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, "छगन भुजबळ साहेब आमचे नेतृत्व आहेत. त्यांनी जरांगेंचे वादळ समर्थपणे पेलले आहे. त्यामुळे ते मंत्रीमंडळात असोत किंवा नसोत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. लवकरच आम्ही रस्त्यावरची लढाई सुरु करणार आहोत. जरांगेंचे आंदोलन सुरु झाल्यावर ओबीसींचेही आंदोलन सुरु होणार आहे," असेही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले आहे.