३ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला, 'नीलकमल' बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर!

21 Dec 2024 16:47:59
 
boat accident
 
मुंबई : (Neelkamal Boat Accident) मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी फेरीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. एलिफंटाच्या दिशेने निघालेल्या नीलकमल या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने जोरदार टक्कर दिल्याने उरण, कारंजा परिसरात बोट उलटली होती. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. दुर्घटनेपासून बेपत्ता असलेल्या एका लहान मुलाचा मृतदेह शनिवारी शोधमोहिमेत सापडला आहे.
 
जेओसी कडून मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर एक ६ वर्षांचा लहान मुलगा बेपत्ता होता. शनिवारी गेट वे इंडिया जवळच्या समुद्रीय भागात लहान मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर नौदलाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढून जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठल्याची माहिती समोर येत आहे. मृत मुलाचे नाव मोहम्मद जोहान अशरफ पठाण असून तो गोवा येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे.
 
तीन दिवसांच्या शोधानंतर या मुलाचा मृतदेह सापडला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. या बोट अपघाताची चौकशी अद्याप सुरु आहे. शोध मोहिमेचा एक भाग म्हणून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी नौदल आणि तटरक्षक दलाचे नौदल हेलिकॉप्टर आणि बोटी तैनात करण्यात आल्या होत्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0