'ट्रूडो सरकार कोसळणार!' खलिस्तानी नेतृत्व सादर करणार अविश्वाचा प्रस्ताव

21 Dec 2024 13:12:16

canada 12

ओटावा : जस्टिन ट्रूडो यांची लिब्रेल पार्टी आणि न्यू डेमोक्रेटीक पार्टी सत्तेमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसत होते. परंतु त्यांच्या मित्रपक्षाने आता त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खलिस्तानी नेते जगमीत सिंह हे येत्या वर्षात ट्रूडो सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव आणणार आहे. लिब्रल पार्टी आणि एनडीपीच्या सहयोगाने ट्रुडो यांचे सरकार आतापर्यंत स्थिर होते, परंतु सिंह यांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

२० डिसेंबर रोजी जगमीत सिंह यांनी X हँडलवर आपले पत्र शेअर करत धक्का दिला. या पत्रात त्यांनी म्हटले की लिब्रेल गटाला दुसरी संधी देऊ नये, म्हणून एनडीपी हे सरकार पाडणार आहे. कॅनडातील नागरिकांनी त्यांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांनाच निवडूण द्यावे. सिंह,ट्रूडो यांच्यावर टीकेचे झोड उठवत म्हणाले की ट्रुडो सरकारला आरोग्याचे, गृहनिर्मीतीचे प्रश्न सोडवता आले नाही. देश सांभाळण्यात आणि आपले कर्तव्य बजावण्यात ट्रुडो अपयशी ठरले आहेत.

ट्रूडो यांचे भविष्य अंधारात!
मागच्याच आठवड्यात कॅनडा सरकारच्या अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ट्रूडो आणि त्यांच्यातील मतभेद त्यांनी जाहीरपणे मांडले. ट्रूडो यांच्या आर्थीक धोरणांमुळे कॅनडातील नागरिकांना गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर आता जगमीत सिंह यांनी सुद्धा विरोधकांच्या खांद्याला खांदा लावत पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. लिब्रल पक्षाच्या गटातील नेत्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार नाताळच्या सुट्टीमध्ये ट्रुडो आपल्या नेतृत्वाचे आत्मपरिक्षण करणार आहेत. ट्रुडो यांच्या सरकारसहीतच पक्षामध्ये सुद्धा राजकीय अनागोंदी बघायला मिळत आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये कॅनडा आपल्या सार्वत्रिक निवडणुकांना सामोरं जाणार आहे. परंतु सरकारमधील घटकपक्षांनी जर अविश्वासाचा प्रस्ताव सादर केला आणि तो मान्य झाला, तर या निवडणुका खूप लवकर होण्याची शक्यता आहे. कॅनडामधील राजकीय स्थित्यांतर बघता, ट्रूडो यांचे भविष्य अंधारात असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

Powered By Sangraha 9.0