नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि आयएनएलडी प्रमुख ओमप्रकाश चौटाला ( Omprakash Chautala ) यांचे शुक्रवारी निधन झाले. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांच्यावर मेदांता येथे उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना सकाळी ११.३५ वाजता मेदांता येथील आपत्कालीन रुग्णालयात आणण्यात आले. मेदांता प्रशासनाने त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी ८ ते २ या वेळेत सिरसा येथील तेजा खेडा फार्म येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या निधनावर मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी शोक व्यक्त केला आहे. हरियाणाच्या राजकारणात ओमप्रकाश चौटाला यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, असे त्यांनी म्हटले आहे.