ठाणे : जुन्या काळातील हिंदी-मराठी गीतांबरोबरच हळुवार मराठी गीते आणि आई जगदंबेला साकडे घालणारी बहारदार गीते सादर करणाऱ्या कोपरीतील `सिनीयर सिटीझन'चे ( Senior Citizen ) नागरिकांनी कौतुक केले. वयाची सत्तरी ओलांडलेल्या अनेक कलाकारांनी सूर व ताल धरीत उत्तमोत्तम गीतांमधून आपल्यातील गुणांचे प्रदर्शन घडविले. तरुणांप्रमाणे उत्साहात झालेल्या या कार्यक्रमात सिनीयर सिटीझन रमल्याचे पाहावयास मिळाले.
कोपरी येथील जगद्गगुरू श्री तुकाराम महाराज क्रीडांगणामध्ये तारामाऊली संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचे आयोजन केले आहे. त्यात `सीनियर सिटीझन-खेळ गीतांचा' कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी उत्साहात पार पाडला. यावेळी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या गीतांच्या बहारदार कार्यक्रमाला `सिनीयर सिटीझन'चा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.